कर्जत (वार्ताहर) : कर्जत-नेरळ रस्त्यावरील वडवळी गावातील रहिवाशी असलेले चिंतामण लदगे हे अनेक वर्षे कारल्याची शेती करतात. पाली भुतीवली धरणातील पाझरून येणारे पाणी उचलून भाजीपाला शेती करणारे कराळे यांच्या शेतातील कारल्याची शेती अवकाळी पावसाने वाया गेली आहे.
वडवली गावातील चिंतामण लदगे आणि त्यांच्या पत्नी गुलाब या आपल्या अपत्य नसल्याने शेतीलाच आपले मुलं मानतात. मुलगा -मुलगी नसल्याने त्याचे टेन्शन न घेता हे दांपत्य अनेक वर्षे भाजीपाला शेती करतात. २००४ मध्ये पाली भुतीवली धरणात पाणीसाठा झाला आणि त्यानंतर या धरणातील पाणी पाझरून नाल्यातून वाहण्यास सुरुवात झाली. त्याआधी तो नाला उन्हाळ्यात कोरडा असायचा. मात्र, आपल्या शेतीच्या बाजूने उन्हाळ्यात वाहणारे पाणी बघून चिंतामण लदगे यांनी उन्हाळ्यात दुबार शेती करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतीमध्ये काहीसे अवघड पीक हे कारल्याची शेती समजली जाते. कारल्याचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला मांडव तयार करावा लागतो, त्या मांडवाच्या खाली कारल्याची वेल ही जमिनीपासून वर चढावी यासाठी दोरीने त्या वेली वरवर न्याव्या लागतात. त्याचवेळी कारल्याच्या वेलींना फळे आल्यावर त्या दोऱ्या तुटू नयेत आणि मांडव देखील कोसळू नये याची काळजी देखील शेतकऱ्याला घ्यावी लागते. त्यामुळे मशागतीच्या दृष्टीने काहीशी अवघड समजली जाणारी कारल्याचे पीक दामू कराळे हे गेली २० वर्षे आपल्या शेतातून घेत आहेत.
मार्च महिन्यातील अवकाळी पावसानंतर कारल्याचे उत्पादन साधारण बंद झाले आहे. जेमतेम महिनाभर कारल्याचे उत्पादन चिंतामण लदगे यांना त्यांच्या शेतातून मिळाले असून, किमान महिनाभर उत्पादन मिळू शकले नसल्याने या शेतकरी दांपत्याचे नुकसान झाले आहे.
५ किलो कारलीदेखील निघणे बंद
लदगे हे त्या काळात दिवसाआड भिवपुरी रोड येथून कल्याण येथील बाजारात कारल्याचे फळ विक्रीसाठी घेवून जायचे. त्यावेळी साधारण ४० ते ५० किलो इतका माल कल्याणच्या गावठी भाजीपाला बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होता. मात्र, अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर पाच किलो कारलीदेखील शेतातून निघणे बंद होऊन बसले आहे.