मुंबई (प्रतिनिधी) : अभयारण्यामध्ये वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर काही परिणामा झाला आहे का? कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी विविध वन्य प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यंदा या गणनेला अवकाळीचा फटका बसला असून शुक्रवारी बुद्धपौर्णिमेला होणारी प्राणी गणना वन विभागाने रद्द केली आहे.
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी प्राणी गणना करण्यात येते. यंदा ही प्राणी गणना ५ मे रोजी होणार होती. मात्र ६ मे पर्यंत अवकाळी पावसा सोबतच ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात होणारी प्राणी गणना वनविभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी अभयारण्यात प्राणी गणना करण्यात येते. या प्राणी गणनेसाठी वन्यजीव प्रेमींसाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे.
बोर,उमरेड आणि नागझिरा या अभयारण्यांतील मचाणावरून करण्यात येणारी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. या अभयारण्यात मचाणवरून टेहळणी करीत प्राणी गणना करण्यासाठी १०९ वन्यजीव प्रेमींनी जंगलातील ५५ मचाणांसाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. दर वर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्धपौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या पारंपरिक वन्यप्राणी गणनेविषयी प्राणीप्रेमींना खूप आकर्षण आहे. त्यातून मिळणारी वन्य प्राण्यांची आकडेवारी अचूक नसली, तरी नव्याने दाखल झालेला वन्य प्राणी अथवा कमी झालेल्या एखाद्या प्राण्याविषयी मिळालेली माहिती नक्कीच उपयोगी ठरते.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे यश…
राज्यात गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाली आहे. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्पाचा देशात आठवा क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्यात सुमारे ४०० हून अधिक वाघ आहेत.