८ जिल्ह्यात कर्फ्यू; राज्यभरात इंटरनेट ठप्प!
चुराचांदपूर : मणिपूर राज्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. राज्यात मेईतेई समाजाला अनुसूचित जनजातीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. तर मेईतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणी विरोधात येथील स्थानिक जनजातीय समूहांद्वारे विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध इतका वाढत चालला आहे की राज्यातील तब्बल ८ जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात पाच दिवसांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे.
वातावरण अधिक चिघळू नये यासाठी सेना आणि अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात आले आहे. ऑल ट्राइबल स्टुडेंट युनियन मणिपूर (एटीएसयूएम) संघटनेने काढलेल्या आदिवासी एकजूटता मार्चमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. त्यानंतर चुराचांदपूर जिल्ह्यातील तोरबुंग परिसरात हिंसेच्या घटना घडल्या.
विरोध प्रदर्शन दरम्यान चुराचांदपूर जिल्ह्यात तोरबंगमध्ये आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्यात संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यावेळी जाळपोळ झाली. या हिंसक घटनांमुळे लोकांना त्यांची घरे सोडून जाणे भाग पडले आहे. इंफाळ पश्चिम, जिरिबाम, थौबल, काकचिंग, विष्णूपूर, चुराचांदपूर, तेंगनौपाल, कांगपोकपी जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
मेईतेई समुदाय मणिपूरमधील पहाडी भागातील जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सुमदायाकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. या समुदायात जास्त हिंदू आहेत आणि ते आदिवासी परंपरांचे पालन करतात.