Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणयंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी टाकणार शिक्षणाचे पहिले पाऊल

यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी टाकणार शिक्षणाचे पहिले पाऊल

शासनाच्या ‘पहिले पाऊल’ उपक्रमाची रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार सुरुवात

रत्नागिरी (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिलीच्या वर्गात यंदा जिल्ह्यातील १० हजार ९५२ विद्यार्थी पहिले पाऊल टाकणार आहेत. शासनाच्या ‘पहिले पाऊल’ उपक्रमाची जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यासाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये शिक्षण विभागासोबत महिला बाल विकास, स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर राबवला जाणार आहे. यामधून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल. पहिले पाऊल कार्यक्रमांसाठी जिल्ह्यांमध्ये मेळावे सुरू आहेत. या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात शालेय शिक्षण, महिला व बालविकास आणि सहभागी घटकांनी सहभागी होऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून हा उपक्रम राबवला जात आहे. यावर्षी जिल्ह्यातील १० हजार ९५२ विद्यार्थी श्रीगणेशा करणार आहेत. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये शिक्षणाच्या प्रवाहात अधिकृतपणे दाखल करून घेण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी मेळावे घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे. दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक शाळेमध्ये पहिले पाऊल हा उपक्रम राबवण्यात आला. दाखल होणाऱ्या मुलांचे ढोल-ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांचा संयुक्त मेळावा झाला. यावेळी केंद्रप्रमुख प्रवीण त्रिभुवने, दीपाली कुवळेकर, रावणंग, मोहिते, नटे तसेच पालकवर्ग उपस्थित होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -