Saturday, October 18, 2025
Happy Diwali

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' दिवशी जाहीर होणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळजवळ निश्चित झाली असून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात देखिल विविध भाकिते वर्तवली जात असून चर्चेला उधाण आले आहे.

पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ दोन तारखाच उरल्या आहेत.

ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ आहे. त्यापैकी एक न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. त्याआधी १३ मे शनिवार आणि १४ मे रोजी रविवार आहे.

त्यात आणखी एक महत्वाचे असे की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. परंतु सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. तेथे १० मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतरच येण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर मग ११ आणि १२ मे या दोन तारखा सर्वाधिक महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ११ किंवा १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा