राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जबर धक्का बसलाच, पण महाविकास आघाडीलाही मोठा हादरा बसला. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार स्थापन करणे ही कल्पना त्यांनी काँग्रेसच्या गळी उतरवली. नगरसेवक किंवा आमदारकीचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदही त्यांनीच दिले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे मोठे आधारस्तंभ म्हणून त्यांची प्रतिमा आजही आहे. पण त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीचे भवितव्य काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचा निर्णय हा खरे तर पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेनेचे प्रवक्ते असलेले खासदार मात्र पवार यांच्या राजीनाम्याने फारच भावुक झालेले दिसले. पवार अध्यक्षपदावरून दूर झाले तर आपले कसे होणार, या विचारानेही या प्रवक्त्यांना पछाडलेले असावे. शरद पवार यांच्या लोक ‘माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती २ मे रोजी प्रकाशित झाली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पवारांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षात हल्लकल्लोळ माजला. पवारांच्या नव्या पुस्तकात त्यांनी गेल्या वीस वर्षांतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. अनेक गुपितेही उघड केली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकाटिप्पणी केली आहे. गेल्या वर्षी शिवसेना विधिमंडळ पक्षात पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधातच बंडाचा झेंडा फडकविला गेला. शिवसेनेतील चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि आमचीच शिवसेना खरी, असा दावा केला. शिवसेना पक्षात ठाकरेंच्या विरोधात प्रचंड खदखद असताना, तेव्हा मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी संकटाला सामोरे जाण्याचे टाळले. याविषयी पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यातच माघार घेतली. संघर्ष न करता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेला विराम मिळाला, असे वर्णन करून पवारांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री असताना प्रकृतीच्या अडचणी असल्या तरी अडीच वर्षांत केवळ दोनच वेळा मंत्रालयात जाणे हे पचनी पडणारे नव्हते, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या शिल्पकाराने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. भिन्न विचाराच्या पक्षांचे सरकार बनवणे व चालवणे ही शरद पवार यांचीही आघाडीचे शिल्पकार म्हणून जबाबदारी होती. पण अडीच वर्षांच्या काळात मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढविल्यावर ठाकरे यांनी पवारांना किती महत्त्व दिले? त्यांचा सल्ला किती ऐकला व अमलात आणला? निदान पवारांच्या प्रशासकीय कामाची पद्धत थोडी जरी आत्मसात केली असती तर महाराष्ट्राचे बरेच काही चांगले झाले असते. पण घरात बसून राहायचे व फेसबुक लाईव्हवरून जनतेला उपदेशाचे डोस पाजायचे यातच उद्धव ठाकरे यांनी स्वत: धन्यता मानली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून आपण फार मोठी चूक केली एवढेच पवारांनी म्हणायचे बाकी होते. संघर्ष न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने मविआची सत्ता गेली, अशा शब्दांत पवारांनी ठाकरेंची कानउघाडणी केली आहे.
राज्य सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात जो मुख्यमंत्री जातच नाही, तो राज्याच्या काय कामाचा? अडीच वर्षांत अकार्यक्षम व नियोजनशून्य घरकोंबडा मुख्यमंत्री मिळाल्याने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले. कोरोनाचे कवच पुढे करून उद्धव यांनी आपल्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. अन्यथा दोन महिन्यांतच त्यांना वर्षावरून गाशा गुंडाळून मातोश्रीवर परतावे लागले असते. राज्याचे प्रमुख म्हणून ते कमी पडले असे शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे. राज्याच्या प्रमुखाला राज्यात जे काही घडत असते त्याची बित्तंबातमी हवी. त्यावर त्याचे बारीक लक्ष असावे लागते. पण उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने त्याची कमतरता जाणवली, त्यामुळे शिवसेनेत फूट टाळण्यात ते कमी पडले असेही त्यांनी स्वच्छपणे मत नोंदवले आहे. शरद पवारांनी उद्धव यांच्याविषयी जो अभिप्राय नोंदवला त्याचा अनुभव एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्वच मंत्र्यांना व नेत्यांना वेळोवेळी आला होता. म्हणूनच त्यांनी सूरत व गुवाहटीला जाण्याचे मोठे धाडस दाखवले. एकनाथ शिंदे व पन्नास आमदार चूपचाप बसून सर्व निमूटपणे सहन करीत राहिले असते, तर महाराष्ट्राचे अतिप्रचंड नुकसान झाले असते व त्याचे खापर भविष्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणाऱ्या शरद पवारांवर फोडले गेले असते. महाआघाडीच्या छत्रपती संभाजीनगर, नागपूर व मुंबई येथे वज्रमूठ सभा झाल्या. या सभांमध्ये उद्धव हे सर्वात शेवटी म्हणजे उशिरा येतात, आपण इतरांपेक्षा मोठे आहोत हे सर्व पक्षांना, नेत्यांना व जनतेला दाखवतात. सत्ता गेली तरी त्यांच्यातला अहंकार कायम आहे. उद्धव भाषणाला उभे राहिले की, त्यांच्या समर्थकांकडून घोषणा व रोषणाई यांचे प्रदर्शन होते. मग काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाआघाडीच्या सभेला उद्धव यांचे भाषण ऐकायला व टाळ्या वाजवायला जायचे का? जो मुख्यमंत्री म्हणून अयशस्वी ठरला तोच वज्रमूठ सभेचा नायक म्हणून मिरवला जाणार असेल, तर महाआघाडीचे भविष्य अंधरामय आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महाआघाडीला हादरे बसायला सुरुवात झाली आहे.