श्री गजानन महाराजांचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला होता. अनेक भक्तांना त्यांच्या भक्तीची प्रचिती येऊ लागली. अनेक ठिकाणाहून भक्तमंडळी महाराजांना पूजन करण्याकरिता घरी आमंत्रित करीत असत. असेच एकदा समर्थ अमरावती येथे आत्माराम भिकाजी ह्यांच्या सदनास जाऊन उतरले. हा आत्माराम भिकाजीसुत अमरावती प्रांताचा मोठा अधिकारी, सदाचारसंपन्न गृहस्थ होता. ह्याच्या घरी समर्थ श्री गजानन महाराजांना मंगल स्नान घालून, नानाविध प्रकारचे उटणे लावून, वस्त्र प्रावरणे लेववून त्याने यथासांग पूजन केले. अशी पूजा स्व-हस्ते झाल्यामुळे त्याच्या मनाला आनंद झाला. अशी समर्थांची पूजा आपण देखील करावी, अशी इच्छा अनेक मंडळींना झाली. पण, संतांनी आपल्या घरी येणे, त्यांचे पूजन होणे याकरिता गाठीशी पुण्य असावे लागते.
अमरावतीमधील एक बडे प्रस्थ श्री गणेश कृष्ण खापर्डे वकील ह्यांच्या घरी देखील महाराजांची अशीच महापूजा संपन्न झाली. त्या पूजनप्रसंगी गणेश आप्पा नामे लिंगायत वाणी, त्याच्या पत्नी चंद्राबाईसह उपस्थित होता. चंद्राबाई ही परम भाविक होती. तिच्या मनात महाराजांना घरी बोलावून त्यांचे पूजन करावे अशी इच्छा झाली. तिने असा मनोदय गणेश आप्पाला सांगितला. त्यावर गणेश आप्पा तिला म्हणाला, ‘हा साधू घरी न्यावयास मोठा वशिला पाहिजे. खापर्डे वकिलांकडे हा साधू आणावयास किती श्रम पडले.’ पण, चंद्रबाईस हे पटत नव्हते. ती पतीला म्हणाली, ‘जर आपले मन निष्पाप असेल, तर साधू आपल्या सदनास येतील. तुम्ही नुसती विनंती तर करा त्यांना. माझी मनोदेवता सांगते आहे की, हे साधू आपल्या घरी येतील.’ पण, गणेश आप्पाची काही बोलण्यास छाती (हिंमत) होत नव्हती. महाराजांनी हे दुरूनच ओळखले आणि ते गणेश आप्पाचा हात धरून बोलले, ‘तुझे घर किती दूर आहे ते मला सांग. तुझ्या घरी यावे व जरा वेळ बसावे, असे मला वाटते आहे.’ हे महाराजांचे बोलणे ऐकून गणेश आप्पास अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीमहाराजांना घरी नेऊन त्यांचे मनोभावे पूजन केले. त्या दिवसापासून गणेश आप्पा आणि चंद्राबाई हे दोघेही महाराजांचे निस्सीम भक्त झाले. ह्याच वेळी आत्माराम भिकाजीचा भाचा जो मुंबई येथे तार मास्तर होता, तो रजा घेऊन आपल्या मामाच्या भेटीकरिता अमरावती येथे आला होता. हा अतिशय भाविक आणि सत्प्रवृत्त असा गृहस्थ होता. अमरावती येथे झालेल्या सर्व ठिकाणच्या पूजन स्थळी हा उपस्थित होता. याचे नाव बाळाभाऊ असे होते. या बाळाभाऊंना श्री महाराजांच्या भक्तीची इतकी ओढ लागली की, ते शेगाव सोडून जावयास तयार होईनात. घरून पत्रे येत असत, पण बाळाभाऊ काही मुंबईस जाईनात. एकदा त्यांना बळेच घालवून दिले, त्यावेळी ते मुंबई येथे गेले. पण, पुन्हा नोकरीचा राजीनामा देऊन शेगावास परत आले. हे पाहून भास्कर महाराज बाळाभाऊंना म्हणाले, ‘वारंवार इथे येऊन आम्हाला का त्रास देतोस. ज्याला विरक्ती झाली त्यानेच येथे यावे.’ भास्कराचे असे अहंकाराचे भाषण महाराजांना खपले नाही. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटण्याकरिता एका गृहस्थाच्या हातातील छत्री हातात घेऊन बाळाभाऊस मारणे सुरू केले. मारता मारता ती छत्री मोडली, तेव्हा महाराजांनी वेळूच्या भरीव काठीने बाळास मारणे सुरू केले. हे पाहून लोक घाबरले. बाळाभाऊ तसेच पडून होते. कैक लोक असे म्हणू लागले की, बाळाभाऊ अशा माराने मेला असावा. आता भास्कर महाराज देखील चिंतातुर झाले. मारत असताना ती काठीसुद्धा मोडून पडली. मग महाराज बाळा भाऊस पायाने तुडवू लागले.
मठात हा प्रकार सुरू असताना काही लोक महाराजांच्या आवडत्या भक्तांना बोलविण्यास गेले. निस्सीम भक्त बंकटलाल व कृष्णाजी हे धावतच तेथे आले. बंकटलाल भीत भीत महाराजांना म्हणाले, ‘समर्था, बाळा भाऊ हा आपला भक्त आहे. आता ह्याला तुडविणे पुरे.’ हे ऐकून समर्थ बंकटलालास म्हणाले, ‘मी बाळास मारले किंवा तुडविले नाही. निरखून पाहा म्हणजे कळून येईल’ आणि महाराज बाळा भाऊस म्हणाले, ‘वत्सा उठ आणि तुझे अंग ह्यांना दाखव.’ अशी महाराजांची आज्ञा होताच, बाळा भाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगास निरखून पाहू लागले. महाराजांनी बाळा भाऊस मारल्याचे कोणतेच वळ किंवा व्रण त्यांना बाळाभाऊंच्या अंगावर दिसून आले नाही. हे सर्व सुरू असताना बाळा भाऊ मात्र आपल्या आनंदात निमग्न होते. हे पाहून भास्कर महाराज यांना देखील बाळाभाऊंचा अधिकार कळून आला. त्यानंतर ते सुद्धा बाळा भाऊस वेडेवाकडे बोलले नाहीत.
त्या योगे भास्कराला।
बाळाभाऊचा अधिकार कळला।
मग तोही ना पुन्हा बोलला।
वेडेवाकडे बाळासी ।।८९।।
सोने कसासी उतरते।
तेव्हाच त्याची किंमत कळते।
आश्चर्य झाले समस्ताते।
तो प्रकार पाहून ।।९०।।
(हेच बाळा भाऊ श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त आणि सेवाधारी बाळाभाऊ महाराज होत. ह्यांनाच श्री गजानन महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी हात धरून आपल्या आसनावर बसविले. ह्यांचे आणि नारायण महाराज ह्या संतद्वयांचे समाधी मंदिर श्री महाराजांच्या मंदिराच्या डाव्या बाजूला नागदेवतेच्या मंदिरालगत आहे.)
सुकलाल अगरवाल हा बाळापूर येथील एक सज्जन. ह्याच्या जवळ एक गाय होती. ही गाय अतिशय द्वाड होती. ही गाय गावात फिरत असे, आपल्या शिंगांनी मुला माणसांना हुंदाडीत असे, कोणाच्याही दुकानात शिरून टोपल्यात तोंड घालून यथेच्छ खात असे, तेलातुपाचे पिंप धक्याने सांडून टाकत असे. बांधून ठेवले तर दोर तोडून पळून जाई. लोक ह्या गाईच्या प्रतापाला कंटाळले होते. सुकलालास लोक म्हणत, ‘ही गाय खाटीकाला दे. नाहीतर तूच तिला मारून टाक.’
ह्यावर सुकलाल लोकांना म्हणत असे, ‘तुम्हीच मारून टाका तिला.’ एकदा एका पठाणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. बंदुकीत गोळी भरून टपून बसला. त्या गाईला हे कसे काय कोण जाणे, कळले. तिने शिंगाने मारून तो पठाण उताणा पडला. लोक सुकलालाला म्हणाले, ‘आता ह्याला एकच युक्ती आहे. समर्थांनी गोविंद बुवांचा घोडा शांत केला. तू तुझी गाय समर्थांना अर्पण कर. म्हणजेच साधूला गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल आणि आमची देखील ह्या गाईच्या त्रासापासून मुक्तता होईल.’ हे सर्वांना पटले. १०-१२ जणांनी मिळून हरळ, सरकी असे खाद्य पदार्थ ठेवून गाईला धरण्याचे प्रयत्न केले. ते पदार्थ खाण्याकरिता गाय तिथे आली तेव्हा सर्वांनी गाईला फास टाकून धरले आणि साखळदंडाने बांधून गाडीवर टाकले आणि शेगावास आणले. जसजसे शेगाव जवळ येऊ लागले, तसतसा गाईच्या वागण्यात फरक पडला. महाराजांना गाय गाडीवर बांधून आणल्याचे दिसताच महाराज लोकांना म्हणाले,
समर्थापुढे येताक्षणी। गाय झाली दीनवाणी ।
तिने लोचनी आणून पाणी।
पहिले त्या पुण्यपुरुषा ।।११।।
महाराज म्हणाले अवघ्यांना। काय हा तुमचा. मूर्खपणा। गाईस ऐश्या यातना।
देणे काही बरे नव्हे ।।१२।।
चारही पाय बांधलेत। गळा साखळदंड लविलेत।
शिंगांचीही तीच गत।
केली चऱ्हाटे काथ्याच्या ।।१३।।
ऐसा मोठा बंदोबस्त। शोभतसे वाघिणीप्रत।
ही गाय बिचारी साक्षात।
तिला न ऐसे करणे बरे ।।१४।।
अरे खुळ्यांनो! ही गाय। अवघ्या जगाची आहे माय ।
तिला बांधीले हाय हाय।
केवढा कठीण प्रसंग आला ।। १५।।
तिला आतच करा मुक्त। ती न हुंदाडी कोणाप्रत।
परी लाविता तिला हात।
छाती कोणाची होईना ।।१६।।
जो तो पाहून मागे सरे। तेथ समर्थ आले त्वरे।
आपुल्या त्या पूनित करे।
बंधने तोडीली धेनूची ।।१७।।
बंधने अवघी तुटता भली। गाय गाडीच्या खाली आली।
पुढले पाय टेकिती झाली ।
समर्था वंदन करावया ।।१८।।
खाली घालुनिया मान। प्रदक्षिणा त्या केल्या तीन।
समर्थांचे दिव्य चरण।
चाटू लागली जिभेने ।।१९।।
ऐसा प्रकार तेथे झाला। तो अवघ्यांनी पहिला।
समर्थांच्या प्रभावाला।
शेषही वर्णू शके ना।।१२०।।
समर्थ म्हणाले धेनूस। बाई कोणा न द्यावा त्रास।
तू या सोडून मठास।
कोठेही जाऊ नको ।।२१।।
अशा प्रकारे गजानन महाराजांच्या प्रभावाने द्वाड गाय एकदम शांत झाली.
क्रमशः
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…