Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदिव्य ज्ञान अनुभवावे...

दिव्य ज्ञान अनुभवावे…

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग विश्वात जे काही चाललेले आहे, ते त्याच्या म्हणजे परमेश्वराच्याच सत्तेने चाललेले आहे. परमेश्वराचे जे प्रकटीकरण आहे, प्रोजेक्न आहे ते चाललेले आहे. हे जे चाललेले आहे याला चळत असे म्हटलेले आहे. “विश्वचळत असे जेणे परमात्माने” त्याच्या नुसत्या अस्तित्वाने हे जग चाललेले आहे म्हणून जग नाही, असे कधी होत नाही. त्याच्या अंगातून हे होत असते, स्फुरत असते. हे का होते? स्फुरण होते, त्याचे कारण आनंद स्फुरदुप आहे. आनंद होतो तेव्हा माणूस उड्या मारतो किंवा पेढे वाटतो. परीक्षेत पहिला आला की, आनंदाने उड्या मारतो. लॉटरी लागली की, आनंदाने उड्या मारतो. आनंद हा स्फुरद्रुप आहे. कुणीही सिक्सर मारला की, लोक टाळ्या पिटतात. ते आनंदाच्या भरात करतात. याला स्फुरण असे म्हणतात. आनंद हा नेहमीच स्फुरद्रुप आहे किंबहुना तो स्फुरदुप असल्यामुळेच. त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, त्याच्या ठिकाणी दिव्यज्ञान आहे. त्या जाणिवेला आनंदाचा स्वाद घेण्याची प्रेरणा होते. आता हा विषय थोडा कठीण आहे. पण, नीट लक्ष देऊन ऐका. आनंदाचा स्वाद घेण्याची ही प्रेरणा जाणिवेत निर्माण होते, पण त्याला त्या आनंदाचा स्वाद घेता येत नाही. आपल्याच अंगी असलेला आनंद आपल्याला भोगता येतो का? तो भोगता येत नाही, तसे परमेश्वराच्या ठिकाणी जी जाणीव आहे तिला आनंदाचा स्वाद घेता येत नाही म्हणून ती जाणीव स्फुरते ती आनंदाला घेऊन स्फुरते. “एकोहंबहुस्यांप्रजयायेम” अनंत कोटी ब्रम्हांडांच्या रूपाने ती प्रकट होते म्हणून विश्वात आनंद आहे, विश्वात शक्ती आहे, त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान आहे. हे अनुभवले, तर अनुभवता येणार. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, तर काय उपयोग? जग कधीही नाहीसे होणार नाही, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. काही बुवा-बाबा सांगतात, जग नाहीसे होणार, पण मी सांगतो, जग कधीही नाहीसे होणार नाही. ‘तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’ उलट जगाचा विस्तार होत आहे आणि आता शास्त्र सुद्धा हेच सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितले आहे.

माझिया विस्तारलेपणाचे निनावे, हे जगची नोहे आगवे
जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही
का बीजची झाले तरू, अथवा भांगारूची अलंकारू
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग।

जगाचा विस्तार होतो आहे तेव्हा लोकांनी काळजी करू नये. बुवा-बाबा काहीही सांगत असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका. हा विश्वास ठेवायचा की, न ठेवायचा हे तू ठरव. कारण, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -