Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ज्ञानाला सजीव करणारी ‘ज्ञानेश्वरी’

ज्ञानाला सजीव करणारी ‘ज्ञानेश्वरी’
  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

एखादी गोष्ट ठरावीक माणसांनाच कळावी, तर माणूस ती गुप्त गोष्ट त्या व्यक्तीच्या कानांत सांगतो. म्हणजे इतरांना ती समजत नाही. वेद एवढे ज्ञानसंपन्न, पण त्यांनीही अशी वागणूक ठेवली. या कल्पनेत ज्ञानेश्वरांची किती रसिकता आहे!

एरव्ही निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींना ज्ञानदेवांच्या दृष्टीमुळे चैतन्य लाभतं नि ते इतकं अनोखं, आगळं असतं की त्याला तोडच नाही!

वेद हे ज्ञानाचं भांडार! परंतु उदारपणात भगवद्गीता ही या वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. याचं वर्णन करताना अठराव्या अध्यायात ज्ञानदेव जणू त्या वेदांना जिवंत करतात, त्यात श्वास घालतात. कसं ते पाहा!

वेदु संपन्नु होय ठांई। परि कृपणु ऐसा आनु नाहीं। जे कानीं लागला तिहीं। वर्णांच्याचि॥ ओवी क्र. १४५७ वेद संपन्न खरा, परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. कारण तो (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) या तीन वर्णांच्याच कानी लागला. (त्यांनाच आपले हृद्गत कानात सांगतो.) आपले वेद ज्ञानाने संपन्न आहेत; परंतु तरीही ते कंजूष आहेत. एखादा माणूस श्रीमंत असूनही आपली संपत्ती काही जणांसाठीच वापरतो, त्याप्रमाणे जणू वेदांनी केलं. त्यांच्याकडील ज्ञान फक्त वरच्या तीन वर्गांनाच दिलं.

हे वर्णन ज्ञानेश्वरीत कमालीच्या काव्यमय रीतीने येतं. कानी लागणं हे क्रियापद ज्ञानदेव इथे वापरतात. या क्रियापदात विलक्षण नाट्य, चित्रमयता आहे. कानी लागणं म्हटल्यावर आपल्याला रोजच्या जगण्याची, माणसांची आठवण येते. एखादी गोष्ट ठरावीक माणसांनाच कळावी, तर माणूस त्या व्यक्तीच्या जवळ जातो, कानी लागतो, ती गुप्त गोष्ट कानांत सांगतो म्हणजे इतरांना ती समजत नाही. वेद एवढे ज्ञानसंपन्न, पण त्यांनीही अशी वागणूक ठेवली. या कल्पनेत ज्ञानेश्वरांची किती रसिकता आहे!

पुढच्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, याशिवाय जे स्त्री, शूद्र आदी जीव त्यांचा रिघाव होण्याला सवडच नाही म्हणून तो (वेद) स्वस्थ बसला आहे. ओवी क्र. १४५८ इथे वेद हा जणू कोणी माणूस आहे, असं चित्रमय वर्णन ज्ञानदेव करतात. त्यानंतरच्या ओवीत तर या चित्रणाने कळस गाठला आहे! ज्ञानदेव म्हणतात, मला असे दिसते की, आपला उणेपणा जाऊन, आपणास सत्कीर्ती मिळावी या हेतूने, वाटेल त्याने आपले सेवन करावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झाला आहे. वेदांनी तीन वर्णांचाच विचार केला; परंतु भगवद्गीतेमध्ये सर्व वर्णांचा, वर्गांचा (स्त्री, दलित आदी) विचार केला आहे. ही वस्तुस्थिती ज्ञानदेव किती रसिकतेने सांगतात, ते मुळातून वाचण्याजोगं आहे.

यालागी मागिली कुटी। भ्याला वेदु गीतेच्या पोटी। रिगाला, आतां गोमटी। कीर्ती पातला॥ ओवी क्र १४६५ एवढ्याकरिता आपल्या मागील निंदेला भ्यालेला वेद गीतेच्या पोटात शिरल्यामुळे उत्तम कीर्तीला पात्र झाला. इथे वेद म्हणजे जणू कोणी मुलं आहेत आणि भगवद्गीता ही आई आहे असं वर्णन येतं. ते मूल घाबरून जाणं, मग त्या लहान मुलाने आईच्या कुशीत शिरणं आणि मग त्याची भीती जाऊन ते इतरांच्या कौतुकाला पात्र होणं. वेदांचं असं नाट्यमय चित्र ज्ञानदेवांनी चितारलं आहे. इथे ज्ञानासारख्या न दिसणाऱ्या गोष्टीला ज्ञानदेव रूप देतात, सहजसुंदरपणे! मग ज्ञानदेवांची बोली अरूपाचें रूप दावीन। ही प्रतिज्ञा सार्थ होते.

(manisharaorane196@gmail.com)

Comments
Add Comment