केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची ग्वाही
मंगळवेढा तालुक्यात उद्योजकांना मिळणार चालना
- सूर्यकांत आसबे
सोलापूर : ‘मी जनतेचा सेवक असून मंगळवेढा परिसरातील बेरोजगारी कमी करून उद्योजक निर्माण करण्यासाठी तुम्ही अर्जासह हाक द्या, मी मदत करण्यास तयार आहे’, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे बोलताना दिली.
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मंगळवेढा महोत्सवात आयोजित कृषी उद्योजक मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव सावंत होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,भीमाचे चेअरमन विश्वराज महाडिक, सचिव प्रियदर्शनी कदम -महाडिक, प्र.कुलगुरू राजेश गादेवार, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,संचालिका डॉ.मीनाक्षी कदम, संचालिका तेजस्विनी कदम,आरपीआयचे दीपक चंदनशिवे,पवन महाडिक, प्रणव परिचारक हे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, सीमावर्ती भागातील मागासलेल्या मंगळवेढ्यातील तरूणांनी ज्याप्रमाणे मेहनत आणि परीश्रम यांची जोड दिल्यास माणूस काहीही करू शकतो, त्याप्रमाणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षात देश १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आला आहे. २०३० साली ३ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
‘देशातील ६ कोटी ४० लाख उद्योग माझ्या कक्षेत आहेत. देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. आपल्याला श्रीमंती गाठायची असेल तर मेहनत करावी लागेल. सोलापूर जिल्ह्य़ात खासगी व सहकारी ४४ साखर कारखाने आहेत. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असूनही दरडोई उत्पन्न कमी आहे. साखर कारखानदारांनी इतर प्रकल्प बनविले पाहिजेत.तरच शेतकऱ्यांना मालाचे व कामगाराला चांगला पगार देवू शकतो. मी आमदार होण्यापूर्वी सिंधुदुर्गला पुर्वी गरीब म्हणायचे. मला दोन वर्षे द्या, गरीबी कमी करतो, हा शब्द दिला व त्यानंतर मासेमारीला प्रोत्साहन दिल्याने तिथले मासे मुंबई सह परदेशात विकले जावू लागले. १९९० साली या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३५ हजारच्या खाली होते. या भागात आंबा, फणस, काजू या फळांवर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने आता ते दोन लाखांच्या आसपास आहे. होलसेल मध्ये ५ रू. किलोने घेतलेला आंबा, त्यावर पॅकिंग व ट्रान्स्पोर्ट करून मार्केटिंग करणारा २० रू. पेक्षा अधिक नफा कमावतो. हा भाग मागासलेला भाग म्हणून सांगण्यात अर्थ नाही मेहनतीने ते सिध्द केले पाहिजे. ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, अननस यांच्या ज्यूसला जागतिक बाजारात चांगली किंमत आहे. घराघरात उद्योग झाल्यामुळे चीन महासत्ता होतो. मग आपली मानसिकता प्रगती करण्याची असली पाहिजे’, असे त्यांनी सांगितले.
‘पंतप्रधानानी ९ वर्षांत ३१ योजना दिल्या. कोरोना काळात कारखाने बंद पडले, रोजगार थांबले. लोकांची उपासमार होऊ नये म्हणून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले. तरूणांनी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावेत. मंगळवेढ्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी क्लस्टर मंजूर करेन. मात्र त्यासाठीची कागदपत्रांची पुर्तता करायला हवी. महिलांसाठी अनेक उद्योग आहेत. त्यासाठी कर्ज व सबसिडी आहे. आधुनिक प्रगतीचे मार्ग कोणते, जगात वापरले जाणारे तंत्रज्ञान याची माहिती व प्रशिक्षण देण्याची तयारी आहे. प्रियदर्शनी कदम या परदेशात उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या भागांमध्ये उद्योजक व बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातील ‘मायाक्का बचत गटा’स जिल्हा परिषदेच्या उमेद योजनेतून ९ लाख ९० हजार रुपये दिले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्रीधर भोसले, राम नेहरवे, यतिराज वाकळे, अजित भोसले, अॅड. शिवाजी पाटील, प्राचार्य रवींद्र काशीद, जयराम अलदर, कल्याण भोसले, आर.बी पवार, मुख्याध्यापक अजित शिंदे, सुभाष बाबर, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, सुनील खंदारे, पर्यवेक्षक राजू काझी, महादेव कोरे, सुहास माने, दिलीप चंदनशिवे, पठाण शिवशरण शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवारच्या सर्व शाखांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियदर्शनी महाडिक यांनी केले. सूत्रसंचालन अभिराम सराफ तर आभार बालाजी शिंदे यांनी मानले.