> मुरुड आगारातील बंद फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
> पर्यटकांची संख्या रोडावल्याने हॉटेल, पटरी, स्टॉल, रिक्षावाल्यांचा व्यवसायही थंडावला
मुरूड : मुरूड अलिबाग मार्गावर असलेल्या साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे मुरूड आगाराची एसटी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील असंख्य प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामधून काहीतरी मार्ग काढा अन्यथा जनतेसाठी जन आंदोलन करु, असा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायीक मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
साळाव पुलाचे डागडुजीचे काम चालु आहे. ही बाब गरजेची आहे. त्यात शंका नाही. पण हे सर्व करत असताना प्रवाशांचे व पर्यटकांचे खूप हाल होत आहे. मुरूड डेपोतील एसटी बसेस व कर्मचारी वर्ग अलिबाग डेपोत वर्ग केल्यामुळे मुरूड डेपोत एसटी बसेस व कर्मचारी वर्गाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे.
त्यात मुरूड डेपोतील कुठलीही गाडी वेळेत नसते. तसेच गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे गाडी जेव्हा येईल तेव्हा निघेल, असे प्रवाशांना सांगितले जाते. दोन-तीन तास वाट बघावी लागते. या अशा पध्दतीने गाड्या लेट होत राहिल्या तर प्रवाशांनी प्रवास कसा करायचा.
मुरूड मधील एसटी बसेसची संख्या कमी झाल्यामुळे मुरुड बोरीवली ही एकच गाडी असून ती भालगांव मार्गे जाते. साळाव चणेरा मार्गे एकही गाडी नाही. मुरूड मुलुंड ही संध्याकाळची गाडी बंद केली आहे. ३:३० ची गाड़ी बंद गेल्यानतंर मुरूड डेपोतून ५:३० ची एकच गाडी आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुरूड हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु एसटी फे-या कमी झाल्यामुळे मुरुड जंजिरा येथे पर्यटक येत नाहीत. त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल, स्टॉल, रिक्षावाले यांच्या व्यवसायावर खुप मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम झाला आहे.
या विषयावर गांभीर्याने चर्चा करावी आणि यातून लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिला आहे.