-
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा १००वा कार्यक्रम रविवारी सहक्षेपित झाला. देशातील प्रत्येक शहरात, गावागावांत आणि विदेशातसुद्धा हा कार्यक्रम सहक्षेपित झाला. मुंबईत विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजर होते. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे कणकवलीमध्ये, तर केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह हे लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये उपस्थित राहिले. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातही हा कार्यक्रम थेट सहक्षेपित झाला. अमेरिका, ब्रिटन, चीन, बांगला देश, मोरोक्को, इंडोनेशिया, मेक्सिको, इराक, दक्षिण आफ्रिका, चिली आदी देशांतील भारतीय दूतावासातही या कार्यक्रमाचे सहक्षेपण झाले. भारतातील पावणेतीनशे आकाशवाणी केंद्रे व पावणेचारशे रेडिओ केंद्रांवरून तसेच दूरदर्शनच्या नेटवर्कवरून ‘मन की बात’ हा कार्यक्रम कोट्यवधी जनतेने ऐकला. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला आणि याच आठवड्यात अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातील विकसित भारत घडविण्याचा संकल्प प्रकट केला. देशात एकीकडे कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. काँग्रेस पक्ष भाजपवर बेलगाम आरोप करीत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विषारी साप म्हणून जहरी टीका करतात आणि त्याच वेळी पंतप्रधान मोदी विकसित भारत घडविण्याचा संकल्प प्रकट करतात. आकाशवाणीवरील पंतप्रधानांचा जनसंवाद हा देश-विदेशातील कोट्यवधी जनता मन लावून ऐकते हीच विरोधी पक्षांची पोटदुखी आहे. पंतप्रधानांनी भारताच्या आकाशवाणीला गेल्या नऊ वर्षांत प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘मन की बात’च्या श्रोत्यांची आकेडवारी १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. नियमित श्रोत्यांची संख्या २३ कोटींवर आहे.
देशातील एक हजारांहून अधिक रेल्वे स्टेशनवर ‘मन की बात’ ऐकण्याची यंदा व्यवस्था केली होती. ‘मन की बात’ कार्यक्रमाला मिळणारा अफाट प्रतिसाद आणि पंतप्रधानांनी या कार्यक्रमातून विविध राज्यांतील विविध स्तरावर असामान्य काम करणाऱ्या लोकांशी साधलेला थेट संवाद हे विरोधी पक्षाला रुचलेले नसावे. म्हणूनच काही तरी खुसपट काढून या कार्यक्रमावर टीका करण्याचे काम ते करीत आहेत. महाराष्ट्रातील महाआघाडीची वज्रमूठ सभा १ मे रोजी मुंबईत झाली, म्हणून ‘मन की बात’ म्हणे आदल्या दिवशी कार्यक्रम घेण्यात आला, अशी बालिश टीकाही महाआघाडीच्या नेत्यांनी केली. पंतप्रधान चीनने केलेल्या आक्रमणाविषयी बोलले नाहीत किंवा अदाणींना २० हजार कोटी कोणी ते दिले ते सांगत नाहीत, असेही प्रश्न विरोधी पक्षाने विचारून आपण किती खुजे आहोत हे देशाला दाखवून दिले. नरेंद्र मोदींनी पन्नास वर्षांनंतर स्वतःचे घरदार सोडले आणि देशसेवेला वाहून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असलेल्या मोदींनी केवळ समाजसेवा आणि देशसेवा याचे हाताला कंकण बांधले आहे. सतत लोकांमध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या मोदींचा लोकसंपर्क अफाट होता व आजही आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना किंवा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांचा जनतेशी थेट संपर्क असायचा. मात्र देशाचे पंतप्रधान झाल्यावर म्हणजे मे २०१४ नंतर पंतप्रधान म्हणून त्यांच्या गाठीभेटींवर मर्यादा पडल्या. सुरक्षा नियम आणि सुरक्षा कवच अशा बंधनात त्यांना राहावे लागले. जनतेपासून दूर राहाणे हा त्यांचा स्वभाव नाही म्हणूनच जनसंवाद साधण्यासाठीच त्यांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला. ‘मन की बात’चा पहिला कार्यक्रम ३० अाॅक्टोबर २०१४ (विजया दशमी)रोजी झाला, ३० ऑक्टोबर २०१६ रोजी २५ वा, ३० डिसेंबर २०१८ रोजी ५० वा, २५ एप्रिल २०२१ रोजी ७५ आणि २९ एप्रिल २०२३ रोजी १०० वा कार्यक्रम झाला. ‘मन की बात’ची अफाट लोकप्रियता व पंतप्रधान साधत असलेला जनसंवाद या विषयावर आयआयएम रोहतक, आयआयएमसी व अन्य दोन संस्थांनी पाहणी केली. लोकशाही प्रक्रियेतील प्रभावी जनसंवाद असे वर्णन करून या पाहणीमध्ये या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाषणाची सुरुवात करताना, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करून जनतेची मने जिंकत असत. बाळासाहेबांच्या या शब्दांनी तमाम शिवसैनिकांना मोठी ऊर्जा मिळत असे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा, मेरे प्यारे देशवासियों असे संबोधून भाषणाला सुरुवात करतात तेव्हा त्यांचे शब्द ऐकताना देशभक्तीची भावना निर्माण होते. गेल्या नऊ वर्षांत मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, अशा जनहिताच्या असंख्य योजना मोदींनी राबवल्या व त्यातून दुर्बल, उपेक्षित वर्गच नव्हे, तर मध्यमवर्गीय आणि उद्योजक बनू पाहणारा सुशिक्षित तरुण मोदींच्या योजनेकडे आकर्षित झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घरघर तिरंगा, हर घर तिरंगा ही मोहीम मोदींच्या ‘मन की बात’मधूनच पुढे आली. स्वातंत्र्य दिनाला संपूर्ण देशात घराघरांवर आणि बसेस, रिक्षा, मोटारी व ट्रक-टेम्पोंवर तिरंगा फडकला तो ‘मन की बात’मधील मोदींच्या घोषणेमुळे.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींशी संवाद साधण्यासाठी सहभागी झाले होते. त्यांनीही या कार्यक्रमाची प्रशंसा केली. ‘मन की बात’ म्हणजे सकारात्मक विचार आणि विधायक दृष्टिकोन. ‘मन की बात’मध्ये कुठेही राजकारण नाही किंवा विरोधी पक्षांवर राजकीय टीकाटिप्पणी नाही. पंतप्रधान मोदींनी संवाद साधताना, माझे मार्गदर्शक लक्ष्मणराव यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. लक्ष्मणराव इनामदार हे गुजरातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. सहकारी भारतीचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. लोक त्यांना वकीलसाहेब म्हणूनही ओळखायचे. दुसऱ्याच्या गुणांची पूजा केली पाहिजे, त्यातून प्रेरणा मिळते, अशी शिकवणूक लक्ष्मणरावांकडून मिळाली, असे नरेंद्र मोदी अभिमानाने सांगतात. ‘मन की बात’च्या शंभराव्या कार्यक्रमात त्यांनी बेटी बचाव आंदोलनातील हरयाणातील सुनील जगलान यांच्याशी संवाद साधला. तसेच जम्मू-काश्मीरमधील पाटी-पेन्सिल बनविणाऱ्या मंजूर अहमदशीही संपर्क साधून त्याची चौकशी केली.
मणिपूरच्या विजय शांती यांच्याशी ते बोलले. येणारी पत्रे व येणारे टेलिफोन यांच्याशी ते संवाद साधतात किंवा त्यांचा ‘मन की बात’मधून उल्लेख करतात. विशेष म्हणजे पत्रे पाठविणारे वा टेलिफोन करणारे लोक सर्वसामान्यांपैकी असतात. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी आपण देशाच प्रधानसेवक असल्याचे म्हटले होते. नेशन फर्स्ट असा पहिला संदेश त्यांनी देशाला दिला. पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी देशाची अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डाॅलर्स होती. हा टप्पा गाठायला देशाला ६० वर्षे लागली. पण गेल्या नऊ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलियन डॅालर्सपर्यंत पोहोचली आहे. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर असलेला भारत गेल्या ९ वर्षांत ५व्या क्रमांकावर आला आहे. कोरोना काळात जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था विस्कटली, पण भारताची स्थिर राहिली. २२० कोटी लसीकरण हा तर भारताचा जागतिक विक्रम ठरला.
विदेशातून लस खरेदी न करता दर्जेदार व प्रभावी लसीची निर्मिती करण्यात भारत यशस्वी ठरला. मोदी सरकार आल्यापासून पावणेचार कोटी गरिबांना हक्काची घरकुले मिळाली आहेत व बहुसंख्य घरे महिलांच्या नावावर आहेत. मुद्रा योजनेखाली सूक्ष्म व लघू उद्योजकांना ४० कोटींहून अधिक कर्जाचे वाटप झाले आहे व त्यातही ७० टक्के लाभधारक या महिला आहेत. पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, पंतप्रधान स्वामित्व योजना, गरिबांसाठी प्राॅपर्टी कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड, आयुष्यमान भारत, डिजिटल इंडिया अशा योजनांनी देशात मोठी क्रांती घडवली आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून दरमहा जनसंवाद साधणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.