लखनऊ-चेन्नई आज भिडणार
वेळ : दुपारी ३.३०
ठिकाण : भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
लखनऊ (वृत्तसंस्था) : गत सामन्यात पराभवाचे तोंड पाहणारे लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ बुधवारी आमनेसामने येणार आहेत. प्ले ऑफ प्रवेशाची शर्यत वाढली असून दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान करणार असून त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात तुंबळ युद्ध पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. विशेष साम्य म्हणजे दोन्ही संघांना गत सामन्यात घरचे मैदान मारता आलेले नाही. त्याची सल या दुकलीला असेल. सोमवारी लखनऊ विरुद्ध बंगळूरु हा सामना याच लखनऊच्या अटलबिहारी वाजयेपी स्टेडियमवर झाला होता. ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन असल्याचे दिसले. खेळपट्टी तशीच राहिल्यास बुधवारीही गोलंदाजांमधील घनघोर युद्ध पहायला मिळले, असा अंदाज आहे. त्यामुळे गोलंदाजच निर्णायक ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु दोन्ही संघांमध्ये धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. त्यांचा मात्र धावा जमवताना कस लागणार.
यंदाच्या हंगामात निम्म्यापेक्षा अधिक सामने झाले आहेत. स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तशी प्ले ऑफच्या प्रवेशाची शर्यतही वाढत आहे. त्यामुळे आता संघही सावध झाले आहेत. लखनऊ आणि चेन्नई या दोन्ही तगड्या संघांना गत सामन्यात मात्र निराशेचा सामना करावा लागला आहे. लखनऊला आपल्या शेवटच्या सामन्यात बंगळूरुविरुद्ध १२७ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. त्यात कर्णधार लोकेश राहुल दुखापतग्रस्त आहे. त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लखनऊच्या चिंतेत भर पडली आहे. कायले मायर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन यांसारखे परदेशी विस्फोटक फलंदाज असूनही लखनऊला सोमवारी १०८ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. खेळपट्टीच फलंदाजीला प्रतिकूल असली तरी या ग्रेड वन फलंदाजांसाठी हे आव्हान नव्हतेच. मात्र त्यातून धडा घेऊन लखनऊचा संघ आता फलंदाजीत सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे.
दुसरीकडे चेन्नईची गाडी यंदाच्या हंगामात सुसाट आहे. प्ले ऑफ मधील प्रवेशाचे ते प्रबळ दावेदार मानले जात असले तरी अद्याप बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे नेमके काय होईल? हे आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यातच पंजाबविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी स्पीडब्रेकरसारखा ठरला. विजयी मार्गावर परतण्यासाठी त्यांना लखनऊला पराभवाच्या खाईत टाकावे लागेल. चेन्नईची फलंदाजी लांबलचक आहे. आणि मधल्या फळीत मनाजोगते प्रयोग करणारे फलंदाज त्यांच्या संघात आहेत. आतार्पंत तिच त्यांची ताकद ठरली आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद असणारे फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. रुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे ही सलामीची जोडी लयीत आहे. शिवम दुबेची बॅट बोलतेय. अजिंक्य रहाणेही षटकार,चौकारांची बरसात करत आहे. तळात महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा हे हिटर आहेत.