देवगड येथील एक जागीच ठार, तर एक जखमी
पेण(वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना महेंद्रा बोलेरो पिकअपने गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, देवगडवरून सुमित खवळे व त्यांची पत्नी स्पृहा खवळे हे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने मुंबईला आंबे घेऊन जात होते. पहाटे ४.१५च्या दरम्यान हमरापूर फाटानजिक पुलावर गाडी आली असता एच. पी. गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिंद्रा बोलेरो पिकअपमधील सुमित चंद्रकांत खवळे(२८, रा. देवगड सिंधुदुर्ग) हे गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी स्पृहा सुमित खवळे(२४) या जागीच ठार झाल्या.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सदर अपघात झाल्याची माहिती मिळताच कल्पेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.