मोहालीत इंडियन्सच्या खेळाडूंची कसोटी?
वेळ : सायं ७.३०
ठिकाण : आय एस बिंद्रा स्टेडियम, मोहाली
मोहाली (वृत्तसंस्था) : गेल्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून आपली मोहीम पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईच्या संघाला बुधवारी पंजाब किंग्जकडून कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. या हंगामातील मागील सामन्यात पंजाबने मुंबईला विजयापासून रोखले होते. त्यामुळे पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची या सामन्यात कसोटी लागणार आहे. प्ले ऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी पंजाब किंग्जला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे. दोन्ही संघ प्रमुख फलंदाजांच्या असातत्य कामगिरीमुळे निराश आहेत. बुधवारचा सामना त्यांच्या फलंदाजांची परीक्षा घेणारा असेल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाचे नऊ सामन्यांतून १० गुण झाले असून ते सहाव्या स्थानावर आहेत. हा सामना जिंकून त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या शक्यता आणखी बळकट करायच्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचे आठ सामन्यांतून आठ गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत एका पराभवामुळे संघासाठी प्ले ऑफचा रस्ता कठीण होऊ शकतो. त्यामुळे मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांसाठी पुढील सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मागील सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या षटकात मिळवलेल्या विजयाने त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून मुंबईला विजयी केले. त्याच्या १४ चेंडूत नाबाद ४५ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सची ७ बाद २१२ धावसंख्याही लिंबूटिंबू ठरली. शिवाय या सामन्यात रोहित वगळता भारताचा टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (५५), ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन (४४), इशान किशन (२८) आणि तिलक वर्मा (नाबाद २९) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. आता विजयी लय कायम राखत पंजाब किंग्जविरुद्ध मुंबईला आपल्या खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. जोफ्रा आर्चरने गत सामन्यात कमाल केली. त्यामुळे पंजाबला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. पंजाबविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खान आणि अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला यांच्यासह अन्य गोलंदाजांकडूनही मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माला धावा जमवण्यात येत असलेले अपयश चिंतेचा विषय असू शकतो.
दुसरीकडे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या पंजाबसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत असलेला सातत्यतेचा अभाव. कर्णधार शिखर धवन आणि काही प्रमाणात दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंग वगळता पंजाबचे इतर फलंदाज अपेक्षित योगदान देण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिले, हे संघासाठी सकारात्मक संकेत आहे. पंजाबला विजयी मोहीम सुरू ठेवायची असेल, तर धवन आणि प्रभसिमरन यांना चांगली सुरुवात करावी लागेल. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा यांनाही मधल्या फळीत उपयुक्त योगदान द्यावे लागेल.