आगाऊ सूचना देणारी पालिकेची नोटीस
ठाणे (प्रतिनिधी) : डोंगर उतारावर राहणाऱ्या ठाणेकरांना दरड कोसळण्याचा धोका असून शहरातील १४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याने त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात साधारणपणे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.
ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा बायपासच्या सैनिक नगर आणि कळवा पूर्व भागातील घोलाईनगर अशा दोन ठिकाणी मागील वर्षी दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले होते. यावर्षी महापालिका प्रशासन सतर्क झाले असून महापालिका हद्दीत कळवा भागात घोलाई नगर, भास्कर नगर, शिवशक्ती नगर, आतकोनेश्वर नगर, वाघोबा नगर आणि पौंड पाडा आदी परिसर तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात खडी मशिन रस्ता, आझाद नगर, सैनिक नगर, गावदेवी मंदिर लगत कैलास नगर आणि केणी नगर, माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती भागात पातलीपाडा, डोंगरी पाडा आणि कशेळी पाडा तर वर्तकनगर प्रभाग समिती परिसरात गुरुदेव आश्रम अशा १४ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही संभाव्य ठिकाणे शोधून काढली असून प्रभाग समितीने या सर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात याव्या, असे कळविण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील डोंगर उतारावर वन विभागाच्या जमिनीवर भूमाफिया झोपड्या बांधून, त्या गरिबांना विक्री केल्या जातात. पावसाळ्यात त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांना आगाऊ सूचना देण्याची नोटीस बजावली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.