Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीशकुनीमामा थोबाड बंद कर अन्यथा उद्धव ठाकरेंना बाहेर पडणे मुश्किल होईल

शकुनीमामा थोबाड बंद कर अन्यथा उद्धव ठाकरेंना बाहेर पडणे मुश्किल होईल

भाजप आमदार नितेश राणे यांचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : उद्धवजी, संजय राऊत या शकुनी मामाचे थोबाड बंद करा. नाहीतर राज्यात तुम्हाला फिरणे मुश्किल होईल, असा धमकीवजा निर्वाणीचा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल करीत असतात. राऊतांच्या या रोजच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यानुसार आज नितेश राणे यांनी चौथी पत्रकार परिषद घेतली.

…तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल

यावेळी नितेश राणे म्हणाले की, मी अजून दोन टक्केच माहिती बाहेर काढली आहे. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते की मी किती माहिती काढावी आणि महाराष्ट्राला द्यावी, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा कामगार माझ्या नेत्यावर, माझ्या पक्षावर बोलायचं बंद करेल तर माझ्या पत्रकार परिषदा बंद होतील. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन. तुम्ही सातत्याने आमच्या पक्षावर आणि नेत्यावर टीका करता मग आम्ही गप्प बसणार नाही. माझ्या अजून पत्रकार परिषदा झाल्या तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होऊन जाईल.

शकुनी मामाला सांगा, मुद्द्यावर बोला…

आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, बावनकुळे यांच्यावर तुमचे नेते वैयक्तीक टीका करतात. पुढे जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लहान नातवावर वैयक्तिक टीका करता. तुम्ही काहीही बोलत बसलात तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्या शकुनी मामाला सांगा मुद्द्यावर बोला. वैयक्तिक टीका करायची नाही, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

अजितदादा करमुक्त, त्यांना सर्वच माफ!

नितेश राणे म्हणाले, काल सभेत अजितदादांनी माझ्यावर टीका केली. तसे म्हटले तर अजितदादांना सर्वच माफ आहे, ते करमुक्त आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. पण संजय राऊतांच्या मालकाला उद्धव ठाकरेंना सांगेन की, तुमच्यावर बोलल्यानंतर तुम्हाला खूप झोंबतं. पण तुमचा सकाळचा कर्मचारी जो रोज सकाळी येऊन आमच्या नेत्यांच्यावर वैयक्तिक टीका करतात ते तुम्हाला इतके दिवस दिसले नाही.

अदानी सोडा, तुमचा इन्कम स्त्रोत काय?

अदानींवर चरित्र लिहिले पाहिजे असेही उद्धव ठाकरे कालच्या वज्रमूठ सभेत म्हणाले. पण असे चरित्र लिहिण्यापेक्षा प्रत्येक मराठी तरुण-तरुणींसाठी उद्धवजी तुमचे एक चरित्र लिहा ना. कुठलेही काम न करता, धंदा न करता, तुमच्या ऑफिसचा पत्ता नसताना पण तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? तुमच्या मातोश्रीचे एकचे दोन झाले कुठून, तुम्ही मोठमोठ्या गाड्या फिरवता यासाठी तुमचा इन्कम काय? अदानींचे उद्योग आम्हाला माहिती आहेत, पण तुमचे काय? असे सवालही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून केले.

नितेश राणे म्हणाले की, अदानींच्या येवढ्या कंपन्या आहेत, त्यांचे येवढे उद्योग आहे. त्या माध्यमातून ते इथपर्यंत पोहचले आहेत, पण तुमचा इनकम येतो कुठून. उद्धव ठाकरेंना कोणत्या कंपनीमधून हा सर्व उत्पन्न येतो आहे, हे आम्हाला माहित आहे.

मातोश्री-२ कोणाच्या पैशाने बांधले?

उद्धव ठाकरेंच्या घरात फिरणाऱ्या गाड्या मराठवाड्याच्या कुठल्या आमदाराच्या नावाने आहेत. त्या आमदाराच्या मेडिकल महाविद्यालयात त्यांची भागिदारी आहे. स्वत:च्या पैशाने गाड्या फिरवायच्या नाही, तुम्ही जे दुसरे मातोश्री-२ बांधले आहे ते कोणाच्या पैशाने बांधले आहे. त्याही बद्दल तुमच्या चरित्रामध्ये लिहा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

अब्जाधीश कसे व्हावे – पुस्तक लिहा

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, मराठी तरुणांना कळु दे उद्धव ठाकरे मालामाल झाले कसे, तरुणांना हा फॉर्मुला द्या, अशी विनंती नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांचे चरित्र लिहिण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्राच्या मराठी तरुण-तरुणींसाठी त्यांचे आत्मचरित्र किंवा चरित्र बाहेर येऊ दे. उद्धव ठाकरे यांचे ‘अब्जाधीश कसे व्हावे’ हे पुस्तक बाहेर येऊ दे, असे नितेश राणे म्हणाले.

मुस्लिम बांधवांना टोप्या काढायला लावल्या

कालच्या सभेत मुस्लिम बांधवांना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?, असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -