सामुदायिक राजीनाम्याचा कार्यकर्त्यांनी दिला इशारा
सटाणा (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी राजकारण सोडून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने या निर्णयाचे ग्रामीण भागात पडसाद उमटू लागले आहेत . बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दुपारी निदर्शने करून पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशाराही तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी राजकारण सोडून निवृत्ती घेण्याचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे आज मुंबई येथे जाहीर केले. वृत्तवाहिन्यांवरून हे वृत्त शहर व तालुक्यात पोहोचताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दुपारी येथील बसस्थानकासमोर तीव्र निदर्शने करून शरद पवारांच्या घोषणा देण्यात आल्या. ‘महाराष्ट्रचा बुलंद आवाज, शरद पवार – शरद पवार…’ अशा घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष केशव मांडवडे म्हणाले, शरद पवार हे देशातील शेतकर्यांचे नेतृत्व करणारे, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळ सुसंस्कृत राजकारण करणारे पवार साहेब सर्वच पक्षांतील नेत्यांना आदर्शवत आहे. त्यांचा निवृत्तीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी व नागरिकांसाठी धक्का देणारा असून ही क्लेशदायक घटना आहे. शरद पवारांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता व्यवस्थित झाला असून आम्हा सर्वांना हा निर्णय नामंजूर आहे. त्यांनी आपला निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचेही तालुकाध्यक्ष मांडवडे यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ज.ल.पाटील, ज्येष्ठ नेते जिभाऊ सोनवणे आदींची भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, माजी नगरसेवक भारत काटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, जनार्दन सोनवणे, सुनील पवार, आनंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, भास्कर सोनवणे, हिरामन गांगुर्डे, केदा सोनवणे, नितिन मांडवडे, बबलू खैरणार, सनीर देवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.