Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शरद पवार फेरविचार करणार! दोन-तीन दिवसात घेणार निर्णय

शरद पवार फेरविचार करणार! दोन-तीन दिवसात घेणार निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले. कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिल्वर ओक येथे सकाळपासून ठाण मांडून बसले होते. राजीनामा त्वरीत मागे घेण्यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटले असले तरी तातडीने आपला निर्णय जाहीर न करता दोन-तीन दिवसात या निर्णयावर पवारसाहेब फेरविचार करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

'आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.' असा निरोप पवारांनी धाडल्याचे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असेही पवारांनी सांगितले आहे.

त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणे धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असेही अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केले होते. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. आता पवारसाहेबांना विचार करायला वेळ द्या. तुम्हीही काहितरी खाभन घ्या. पवार साहेबांना आपला कार्यकर्ता उपाशीपोटी राहिल्याचे आवडणार नाही, तेव्हा सर्वांनी दोन-तीन दिवस वाट पहा, जे सर्वांच्या मनात आहे, तेच सर्वांच्या मनासारखे होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

Comments
Add Comment