अमेरिका : अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात सोमवारी धुळीचे जोरदार चक्रीवादळ सुरु झाले. येथील महामार्गावरुन येणा-या वाहनचालकांना समोरचे दिसण्यास अडथळा निर्माण झाल्याने भीषण अपघात झाला. महामार्गावर कार-वाहनांचा वेग जास्त असल्याने सुमारे ८० गाड्यांची जोरदार धडक झाली. यात २० व्यावसायिक वाहने आणि ६० हून अधिक कारचा समावेश होता. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला.
सेंट लुईसच्या उत्तरेस ७५ मैल (१२० किमी) अंतरावर असलेल्या माँटगोमेरी काउंटीमध्ये महामार्गावर जोरदार सुटलेल्या चक्रीवादळामुळे स्पष्ट दिसत नव्हते. चक्रीवादळाच्या वेळी ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या गाड्यांची धडक झाली. इलिनॉय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये २ वर्षांच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांचा समावेश आहे. हा महामार्ग दोन्ही दिशांनी बंद करण्यात आला होता. जो आज म्हणजेच मंगळवारी दुपारपर्यंत खुला केला जाणार आहे.
सेंट लुई हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, नव्याने नांगरलेली शेते आणि वायव्येकडील जोरदार वारे यांच्या संयोगाने धुळीचे वादळ निर्माण झाले होते. ज्याचा वेग ताशी ७० किमी होता. त्यामुळे समोर काहीच दिसत नसल्याने ही अपघाताची घटना झाली.