
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर झाल्यानंतर अतिरिक्त आणि कार्यरत असा भेदभाव न करता सरसकट सर्व शिक्षकांना ‘बीएलओ’ची कामे देण्यात आली होती. मात्र शिक्षकांना गावी जाता यावे म्हणून शिक्षक संघटनेच्या पाठपुरव्यामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र हे निर्णय कोणामुळे झाले याचे श्रेय घेण्यासाठी शिक्षक संघटनांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शाळांना आज १ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात मुंबईतील ६०० शिक्षकांना ‘बीएलओ’ची कामे देण्यात आली होती. त्यामुळे शिक्षकांना आपल्या गावी जाण्याचे निर्णय रद्द करण्याची वेळ आली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांना ही ‘बीएलओ’ची कामे न देता त्यांना सुट्टी द्यावी, असे एक निवेदन २९ एप्रिल रोजी दिले होते.
- मुंबई उपनगर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून शनिवारी सुमारे ६०० शिक्षकांच्या ‘बीएलओ’ नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले होते. या प्रकरणी शिक्षक सेनेचे अध्यक्ष
ज. मो. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची भेट घेत उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना ‘बीएलओ’ची कामे न देण्याची मागणी केली. - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक शिक्षकांनी कुटुंबासह मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे तसेच एसटी बसेसचे आगाऊ आरक्षण केले होते. मात्र त्यांच्यावर निवडणूक कामाची सक्ती केल्यास शिक्षकांची सुट्टी रद्द होण्याचीही शक्यता निर्माण झाली होती.
- गावी जाणाऱ्या शिक्षकांना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांने रेल्वेचे तिकीट रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मात्र आता ही सुट्टी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षक संघटनांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. तरी शिक्षकांनी मात्र या वादात न पडता गावी जाण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली आहे.