नागपूर: सध्या राज्यात पुन्हा एकदा जो राजकीय भूकंप झाला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर एकच गर्दी केली आहे. शरद पवार यांनी राजीमान मागे घ्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जात असताना आता देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ माजली आहे.
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सध्या यावर भाष्य न करण्याचे म्हटले. मात्र त्यापुढे बोलताना शरद पवार यांनी पुस्तक लिहिले आहे तसे मीही लिहिणार असून त्यातही अनेक गौप्यस्फोट असतील असा सूचक इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते म्हणाले “हे काय होतंय, का होतंय, या सर्व गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही यावर बोलणं योग्य ठरेल. शरद पवार यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. पण मलाही पुस्तक लिहायचं आहे. मी त्यामध्ये योग्य गोष्टी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते मी पुस्तकात लिहीन”, अशी सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
शरद पवार यांनी पुस्तकात पहाटेच्या शपथविधीविषयी मला माहिती नव्हती असा गौप्यस्फोट केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीची माहिती शरद पवार यांना आधीच होती असे वक्तव्य याआधी केले होते. मात्र, या आरोप प्रत्यारोपांच्या झडतीत आज शरद पवार निर्णय मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.