Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाIPL 2024बंगळूरुची लखनऊवर सरशी

बंगळूरुची लखनऊवर सरशी

अवघ्या १२६ धावा जमवूनही रॉयल चॅलेंजर्सची बाजी

लखनऊ (वृत्तसंस्था) : विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसची दमदार सलामी आणि गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊवर १८ धावांनी विजय मिळवला. अवघ्या १२७ धावांचा पाठलाग करणे लखनऊसारख्या तगड्या फलंदाज असलेल्या संघाला न जमल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊच्या फलंदाजांनी निराश केले. कृष्णप्पा गोवथमने सर्वाधिक २३ धावा जमवल्या. लखनऊचे अन्य फलंदाज मात्र धावा जमवण्यात अपयशी ठरले. अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक या जोडगोळीने गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रमुख फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. नवीन उल-हकने १३ धावा जोडल्या. अमित मिश्राने १९ धावा जमवत सामन्यात रंजकता आणली होती. परंतु अन्य फलंदाजांनी निराश केल्याने लखनऊचा संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. बंगळूरुच्या सांघिक गोलंदाजीचे दर्शन सोमवारी झाले. कर्ण शर्मा, जोश हेजलवूडसह त्यांच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.

बंगळूरुचा ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात विराट कोहलीला ३१ धावांवर बाद करत रवि बिश्नोईने ही जोडी फोडली. त्यानंतर फाफने बंगळूरुचा डाव पुढे नेला. फाफ डु प्लेसीसने ४४ धावा केल्या. त्यानंतर मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा एकही फलंदाज मैदानात थांबू शकला नाही. दिनेश कार्तिकने केवळ १६ धावा केल्या. तो धावचित झाला. बंगळुरूला २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १२६ धावा करता आल्या. नवीन-उल-हकने ३, तर रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -