कार्यकर्त्यांना म्हणाले, “रडारड करू नका, हे कधी ना कधी होणार होतं..”
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते भावूक झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांना झापले आणि इतर नेत्यांपेक्षा वेगळे मत मांडले.
यावेळी अजित पवार म्हणाले की पवार साहेब नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत. काँग्रेस मध्ये खर्गे अध्यक्ष आहेत तरी पण सोनिया गांधी काम करतात. पवार यांनी सांगितले, भाकरी फिरवयाची आहे, ते बोलले आहेत. पवार साहेब असताना नवीन अध्यक्ष हा काही काळात शिकेल. कुणीही अध्यक्ष झाले तरी साहेबच अध्यक्ष राहतील.
साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणि मार्गदर्शनानुसार नवीन अध्यक्ष काम करील. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब राजकारणातील त्याला बारकावे सांगतील. साहेबांच्या नजरेसमोर नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे, असा सवाल विचारत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अश्रू ढाळण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. रडारड करण्याचे कारण नाही. साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी होतील, असा सज्जड दम वजा इशारा कार्यकर्त्यांना दिला.