Saturday, October 25, 2025
Happy Diwali

कोकणच्या विकासाआड येणाऱ्याला विरोध करणारच : नारायण राणे

कोकणच्या विकासाआड येणाऱ्याला विरोध करणारच : नारायण राणे

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणच्या विकासाआड कोण येईल त्याला मी विरोध करणार. मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असले तरी. त्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढला तर मी रिफायनरी समर्थनात त्याच ठिकाणी मोर्चा काढणार, असा स्पष्ट इशारा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. कणकवली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० व्या "मन की बात" कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, एअरपोर्टला विरोध, सी वर्ल्डला विरोध, कोणताही प्रकल्प आला त्याला विरोध, मग कसा कोकणचा विकास होईल? काही वर्षांपूर्वी बोलत होते की, आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया बनवू. मात्रा कोकणात काय करायचे झाले की यांचा विरोध उभा राहतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री राणे यांनी संताप व्यक्त केला. विरोधकांनी माहिती घ्यावी कॅलिफोर्नियामध्ये असे चौदा प्रकल्प आहेत. कोकणी तरुणांना नोकऱ्या पाहिजेत, रोजगार पाहिजेत, आर्थिक प्रगती व्हायची असेल, तर उद्योगाशिवाय काहीच शक्य नाही. एक-दीड लाख करोड खर्च करून जो प्रकल्प येणार, तो प्रकल्प हजारो शिकलेल्या मुला-मुलींना नोकऱ्या मिळवून देणारा आहे. आजच्या स्थितीत हजारो मुलं बेकार आहेत. डीएड झालेले अनेक जण नऊ-दहा वर्षे बेकार आहेत. हा प्रश्न का नाही सोडवला? असा सवाल त्यांनी केला.

शिकलेले पदवीधर आज बेकार आहेत. मग हे कशाला विरोध करतात. त्यांना नोकऱ्या कुठून देणार? कोण उद्धव ठाकरे? त्याला घेऊन या, मी ही बघतो. विरोध करायला इथे. जर कोणीही यापुढे कोकणातील प्रकल्पांना विरोध करेल. त्याला मी सामोरे जाईन, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा