पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजू साळुंखे यांना अटक
किरीट सोमय्या यांची माहिती
पुणे (प्रतिनिधी) : येथील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटलचे राजू साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. राजू साळुंखे हे संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे व्यावसायिक भागीदार आहेत, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला..
कोविड काळात पुण्यातील शिवाजीनगर येथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुजीत पाटकर आणि राजू साळूंखे यांची भागीदारी असलेल्या कंपनीला कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. कोविड सेंटर उभारण्यासाठी दोघांनी बोगस कंपनी निर्माण केली. तरीही ठाकरे सरकारने त्यांना कंत्राट दिले, असा सोमय्या यांनी आरोप केला होता. याप्रकरणी राजीव साळुंखे यांच्यासह पुण्यातील लाईफलाईन हॉस्पिटलचे भागीदार सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यातील राजू साळूंखे यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. या जम्बो कोविड सेंटरमध्ये तीन कोविड पेंशटचा निष्काळजीपणे मृत्यू झाला होता, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता. त्यामुळे उर्वरित आरोपींवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.