
राजीव साळुंखे हा सुजीत पाटकर आणि संजय राऊत यांचा पार्टनर असल्याची किरीट सोमय्यांनी दिली माहिती
पुणे : पुण्यातल्या शिवाजी नगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिली. या जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखे हा संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचा पार्टनर असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले, "या प्रकरणात अजून तीन जण फरार आहेत. हेमंत गुप्ता, संजय शाह, सुजित पाटकर हे फरार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते."
Pune Shivaji Nagar COVID Center Scam Raju Salunkhe arrested
Kirit Somaiya demands arrest of Sanjay Raut's Partner Sujeet Patker of Lifeline Hospital Management Services @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/bbn1SJcriw
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 1, 2023
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आणखी तीन पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा या तिघांना अटक होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचे कंत्राट दिले गेले होते. त्यामध्ये तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात कारवाई तर होणारच, असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.
राजीव साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनी विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही दिले होते कंत्राट
यांची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॅक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसे दिले जाते, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.