 
                            - गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजारात या आठवड्यात देखील मर्यादित तेजी झाली. सध्या निर्देशांकात अल्पमुदतीच्या चार्टनुसार तेजीचा “कप अँड हँडल” ही रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अल्पमुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र फंडामेंटल बाबींकडे पाहता निर्देशांक उच्चांकाला आलेले आहेत.
पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १७७०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या वर आहेत, तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. फंडामेंटल बाबींचा विचार करता निर्देशांकांचे पी.ई. गुणोत्तर हे खूप जास्त आहे. टेक्निकल अॅनालिसीसनुसार सिंजिन, आयटीसी, करिअर पॉइंट, न्युक्लीयस सोफ्टवेअर, ग्लेनमार्क फार्मा यांसह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. अल्पमुदतीचा विचारकरता “अपोलो टायर” या शेअरने ३४३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ३४६ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. शेअर खरेदी करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
मी माझ्या मागील अर्थात ८ एप्रिल २०२३ च्या लेखात मध्यम मुदतीचा विचार करीता “अपटेक लिमिटेड” या शेअरने ३८८ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ४११ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील घसरणीत मध्यम मुदतीसाठी ३४० रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल, हे सांगितलेले होते.
मी सांगितल्यानंतर केवळ दोन आठवड्यांत “अपटेक लिमिटेड” या शेअरने ४६१.८० हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर जवळपास १२ टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार अल्प मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा रेंज बाऊंड झालेली आहे. जोपर्यंत सोने या रेंज बाऊंड अवस्थेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी किंवा मंदी येणार नाही. अल्प मुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती मंदीची आहे. टेक्निकल अॅनालिसीसनुसार जोपर्यंत चांदी ७५९५० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत चांदीमधील मंदी कायम राहील.
अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात. त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना टेक्निकल आणि फंडामेंटल अशा दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करणे आवश्यक असते. शेअर बाजारामध्ये निर्देशांकांची असणारी मुख्य दिशा आणि त्यानंतर त्या मुख्य दिशेच्या विपरीत असणारी दिशा अर्थात करेक्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करावी लागते.
शेअर बाजाराची मुख्य दिशा तेजीची असेल तर येणारे करेक्शन ही खरेदीची संधी असते. याउलट शेअर बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल, तर येणारे करेक्शन अर्थात बाऊन्स ही शेअर्स विक्रीची संधी असते. सध्या शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे मात्र टेक्निकल आणि फंडामेंटल बाबतीत निर्देशांक हे उच्चांकाला असल्याने शेअर्स खरेदी करण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापुढे काही काळ कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस लावून केवळ अल्पमुदतीच्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही) samrajyainvestments@gmail.com

 
     
    




