‘मन की बात’ हा पंतप्रधान मोदी यांचा कोट्यवधी भारतीयांशी संवाद साधण्याचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम सुरू झाला तो २०१४ मध्ये म्हणजे प्रथम मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर. त्यानंतर मोदी यांची लोकप्रियता आणखी कितीतरी पटींनी वाढली आणि त्यात वाढच होत गेली आहे. मोदी यांच्या ‘मन की बात’ची विरोधकांतर्फे भरपूर टिंगल केली गेली. स्वतः आरामखुर्चीत बसून उपदेश करणाऱ्या विरोधी नेत्यांनी त्यांना गन की बात करा म्हटले तर कुणी मोदींच्या राजकीय अजेंड्यावर टीका केली. पण मन की बातची लोकप्रियता कमी तर झालीच नाही, पण रविवारी शंभरावा भाग सादर करताना ‘मन की बात’साठी अभूतपूर्व उत्सुकता भारतवासीयांमध्ये निर्माण झालेली दिसली. तशी तर मोदी यांची जागतिक पातळीवर लोकप्रिय नेते म्हणून प्रसिद्धी आहे. पण एखाद्या पंतप्रधानांनी सातत्याने आठ-नऊ वर्षे देशवासीयांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम रेडिओसारख्या माध्यमातून करणे हे आजपर्यंत कुठेही झालेले नाही. मोदी यांनी या कार्यक्रमाद्वारे कोट्यवधी भारतीयांशी संवाद साधला. त्यांच्या या कार्यक्रमात नेहमीच स्वच्छ भारत अभियान, कित्येक सामान्य लोकांनी पुढे येऊन केलेली अचाट कामे, योगा, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा कित्येक योजनांवर मोदींनी चर्चा केली आहे. यातून कित्येकांना प्रेरणा मिळाली आहे. आपल्याकडे सरकारी भाषणे आणि सरकारी प्रचार म्हणजे काहीतरी पाप आहे, असे मानले जाते. सरकारच्या बाजूने बोलणे म्हणजे लगेच सरकारचा भाट आहे आणि सरकारी प्रचाराची पोपटपंची करणे असे समजले जाते. इतके आपले विचार स्वस्त आणि सवंग असतात. पण एक गोष्ट नमूद करायला हवी की, पंतप्रधान मोदी यांनी इतक्या वर्षांत कधीही भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला नाहीच, पण त्यांनी भाजपचा उल्लेखही इतक्या भागांमध्ये एकदाही केलेला नाही. विरोधक काहीही म्हणत असले तरीही ‘मन की बात’मध्ये कधीही भाजपचा विषय आणलेला नाही. मोदी यांची लोकप्रियता आज अलग अशा स्तरावर पोहोचली आहे. देशातील सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी मोदी यांनी एक वेगळी आणि अनोखी सुरुवात मन की बात कार्यक्रमामधून केली. पूर्वी काँग्रेसच्या सरकारांमध्ये पंतप्रधान किंवा त्यांच्या खालच्या स्तरावरील नेते आणि जनता यांच्यात एक अदृष्य दरी होतीच. हे नेते कधीही सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी येत नसत. आज तर काँग्रेस नेते सामान्य जनांशी नातेच विसरून गेले आहेत. निवडणुकीच्या काळातच ते जनतेसमोर येऊन गरिबी हटावसारख्या लोकप्रिय घोषणा देत असत. प्रत्यक्षात गरिबी कधी हटलीच नाही आणि या नेत्यांच्या भव्यदिव्य जीवनशैलीचीच चर्चा होत असे. पण मोदी असे नेते आहेत की, ज्यांनी देशातील सामान्यजनांशी नियमित संवाद साधला आहे. त्यांच्या सूचना मागवल्या आहेत आणि राष्ट्राच्या प्रशासनात सामान्यांना काहीतरी महत्त्वाचा सहभाग आहे, अशी जाणीव लोकांना करून दिली. मोदींनी देशातील सर्वात लोकप्रिय संवादाचे माध्यम रेडिओची निवड केली. दूरचित्रवाणीमुळे रेडिओ हे एकेकाळचे सर्वसामान्यांचे आवडते माध्यम मागे पडले असले तरीही आजही ग्रामीण भागात रेडिओ हेच माध्यम लोकांच्या जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे मोदी यांनी त्याची निवड करून कोट्यवधी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग निवडला. जेव्हा आपण हा कार्यक्रम ऐकतो तेव्हा असे वाटते की, मोदी आपल्या घरात अगदी समोर बसून आपले विचार ऐकवत आहेत. मोदी यांच्या मन की बातने इतकी अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली की, संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातही शंभराव्या भागाचे प्रसारण झाले. शब्दांचे सामर्थ्य किती असते, याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. दुसरे महायुद्ध जरी दोस्त राष्ट्रांनी जिंकले असले तरीही पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या जनतेत चैतन्य भरणाऱ्या एका भाषणाने इंग्लंडचे सैन्य खंबीरपणे उभे राहिले आणि इंग्लंडने म्हणजे दोस्तांनी हिटलरला पराभूत केले, हा इतिहास आहे. मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात त्याच प्रकारचे लोकांना सामाजिक आशय सांगणारे आणि चेतना देणारे भारलेले शब्द असतात. मोदींचा कार्यक्रम सामान्य लोकांपर्यंत किती जिव्हाळ्याचा आहे, याचे प्रमाण दर्शवणारी आकडेवारी आहे. त्यानुसार देशातील २३ कोटी नागरिक मन की बात नियमितपणे पाहतात आणि ९६ टक्के नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती असते. इतकेच नव्हे, मोदींनी कार्यक्रमातील अनेक विषयांवरील चर्चा केल्यानंतर त्यांनी जन आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. मोदींनी सामाजिक संदेश दिल्यानंतर काहीच तासांत ते समाजमाध्यमांवर ट्रेंड बनतात आणि चळवळीचे स्वरूप घेतात. सहसा ३० ते ४० मिनिटांच्या या कार्यक्रमात मोदी सरकारने विविध मुद्द्यांवर उचललेली पावले आणि सामाजिक योजना यावरच चर्चा होते. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा संरक्षण, शिक्षण व्यवस्था, सेंद्रीय शेती वगैरे कितीतरी अनेक विषय मोदींनी घेतले असून त्यावर आपले विचार स्पष्ट केले आहेत. हा एक सरकारी प्रचारकी कार्यक्रम नाही तर सामान्य माणसाशी थेट पंतप्रधानांनी साधलेला संवाद आहे, असे लोकांच्या लक्षात आले तेव्हा त्याची लोकप्रियता वाढत गेली. अगदी परीक्षेसारख्या विषयावरही मोदी मार्गदर्शन करतात. नागरिक मोदी यांना पत्र लिहितात आणि काय विषय असावेत, याचीही सूचना करतात. मोदी यांचा हा एकपात्री कार्यक्रम नाही तर दुहेरी संवादाचा कार्यक्रम आहे. मोदी प्रत्यक्ष सामान्य लोकांना फोन करून संवाद साधतात, ही सामान्य बाब नव्हे. विविध वर्गांचे सबलीकरण मोदींनी या कार्यक्रमातून केले आहे, हे विशेष आहे.
कोट्यवधी भारतीयांशी मोदींचा संवाद
