पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भावपूर्ण उद्गार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमीचे ते पर्व होते आणि आम्ही सर्वांनी मिळून ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचे पर्व. मन की बातसुद्धा देशवासीयांच्या भलेपणाचे, सकारात्मकतेचे एक आगळंवेगळे पर्व बनले आहे. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस, उदाहरणांचे नावीन्य, देशवासीयांच्या यशस्वितेचा विस्तार होता. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक जोडले गेले. ज्या विषयाशी लोक जोडले गेले, तो लोक आंदोलनाचा विषय झाला. जेव्हा मी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मन की बात सामायिक केली, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.
आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाचा १००वा भाग सादर करताना ते बोलत होते. यावेळी केलेल्या संवादाचा हा गोषवारा… माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे; परंतु वास्तविक अभिनंदनास पात्र तर आपण सर्व श्रोते आहात, असे ते म्हणाले.
मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते, लक्ष्मणराव इनामदार. आम्ही त्यांना वकीलसाहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत की, कुणीही दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कुणीही असो, आपला साथीदार असो की आपला विरोधी गटातील असो, त्याचे चांगले गुण जाणण्याची, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे. मन की बात अहंपासून ते वयमपर्यंतचा प्रवास आहे. हा मी नाही तर तूही याची संस्कारसाधना आहे. आज मागचे कितीतरी भाग, पुन्हा डोळ्यांसमोर येत आहेत. देशवासीयांच्या या प्रयत्नांमुळे मला सातत्याने स्वतःला कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली आहे. मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो, ते सर्व आमचे हिरो आहेते, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवले आहे. आज जेव्हा आम्ही १००व्या भागाच्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आहोत, माझी इच्छा आहे की, पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाबाबत जाणून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
‘मन की बात’च्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या तसेच त्यांना गतीदेखील प्राप्त झाली. आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनरुस्थापित करण्याचे मिशन ‘मन की बात’पासूनच तर सुरू झाले होते. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील ‘मन की बात’पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरू केली होती, गरीब लहान दुकानदारांसोबत घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली, तेव्हादेखील देशवासीयांना या मोहिमेशी जोडण्यात ‘मन की बात’ने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
देशात पर्यटनाचा विकास वेगाने होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थाने असोत त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयीदेखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान १५ पर्यटनस्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळे तुम्ही राहता त्या राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातील असली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
१०० भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज मला इतकं काही सांगायचं आहे की, वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की, तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तुमच्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासीयांच्या यशाचा आनंद साजरा करूया, असे शेवटी मोदी यांनी सांगितले.