Monday, October 20, 2025
Happy Diwali

आता घ्या झटपट घटस्फोट! सहा महिने थांबण्याची गरज नाही

आता घ्या झटपट घटस्फोट! सहा महिने थांबण्याची गरज नाही

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

नवी दिल्ली : नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसेल, तर त्या दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावे लागत होते. मात्र जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होत नसेल, तर थांबण्याची काही गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये घटस्फोट प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. फॅमिली कोर्टाकडे प्रकरण न पाठवता १४२व्या अनुच्छेदानुसार, सर्वोच्च न्यायालय घटस्फोट देऊ शकते का, असे या याचिकेत विचारण्यात आले होते. त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. नात्यात कधीही सुधारणा होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणे कोर्टाला शक्य आहे, असे या खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे दोघांना आता लवकर वेगळे होता येणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार, पती-पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास फॅमिली कोर्टात जावे लागते. या कोर्टाकडून त्यांना विचार करण्यासाठी आणि एकमेकांमधले नाते सुधारण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. त्यामुळे घटस्फोट लगेच मिळत नाही, त्यासाठी हा वेळ जावा लागतो. यामध्ये अनेकदा काही जोडप्यांचा घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसेल, तर दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येणार आहे.
Comments
Add Comment