Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात आजपासून सुरू झाले ३१७ ‘आपला दवाखाना’

राज्यात आजपासून सुरू झाले ३१७ ‘आपला दवाखाना’

गरजूंसाठी घराजवळच उपलब्ध होणार उपचारसुविधा

हे आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य : मुख्यमंत्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र’ हे आपले ध्येय आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे’, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचारसुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील, असे ते म्हणाले. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या – त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

‘आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्याछोट्या आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचारांची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात ‘आपला दवाखाना’ सुरू होत आहे. आज मुंबईमध्ये सुमारे २५० ‘आपला दवाखाना’ कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५ व्या वित्त आयोगांतर्गत स्थापित केली जाणार आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरू होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात. अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील ८ कोटी लोकांना मिळणार मोफत उपचार…

‘पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत मिळत आहेत आणि आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत होत आहेत. यातून जवळपास ९०० ऑपरेशन्स आणि उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत. किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत’, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. आपला दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले, वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहेत. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असेही फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -