मराठीला व मानवी साहित्याला शुद्धलेखन नियमांची गरज भासत नाही… व्याकरण हेच भाषेत काय, कसे, कुठे आहे ते सांगते. आपण बोलतो त्यातच व्याकरण असते.
- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
शाळेत असताना, कोणाला झोप येत नसेल, तर आम्ही व्याकरणाचं पुस्तक वाचण्याचा सल्ला द्यायचो. कारण, तो शाळकरी वयातला स्वानुभव होता. इतर विषयांपेक्षा ‘भाषा’ या विषयात नेहमीच कमी गुण मिळायचे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत उत्तरपत्रिका लाल रेषांनी भरलेली असायची ती केवळ व्याकरणाच्या चुकांमुळेच!
अलीकडेच वाचनात आले की, संगणकतज्ज्ञ शुभानन गांगल यांनी ‘शोध मराठीचा’ हे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या मते ‘एक वेलांटी, एक उकार,’ हे तत्त्व त्याचाच भाग आहे. हे वाचल्यावर भाषा विषयाचा अभ्यास सोपा झाल्याचा भास झाला. पुढे त्यांनी असेही मत मांडले आहे की, मराठीचा उपजत मूलभूत स्वभाव इतका नैसर्गिक आहे की, तो आत्मसात केला की, मराठीचे ‘बोली’ आणि ‘पुस्तकी’ व्याकरण एकरूप होते.
मराठीला व मानवी साहित्याला शुद्धलेखन नियमांची गरज भासत नाही… व्याकरण हेच भाषेत काय, कसे, कुठे आहे ते सांगते. आपण बोलतो त्यातच व्याकरण असते. शुभानन गांगल यांच्या या मताच्या पार्श्वभूमीवर मराठीतील काही शब्द म्हणजे सुत (मुलगा) आणि सूत (धागा) किंवा दिन (दिवस) आणि दीन (गरीब) अशा शब्दांच्या बाबतीत माझ्या मनात शंका उरतेच!
याउलट मराठी शुद्धलेखन या विषयावर नेहमीच मौल्यवान मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासक सत्त्वशीला सामंत यांनी व्याकरणाच्या बाबतीत लिहिलेले आठवले -‘लेखकु नोहे वाचकविण!’ लेखन या संज्ञेचा किमान निकष म्हणजे ‘आकलन सुलभता’ किंवा ‘आस्वादयोग्यता.’ पण, आजकाल प्रमाणलेखन नियमांची बंधने झुगारून लेखन केलं जातं. त्यामुळे खरी गरज वाटते आहे ती कोणीतरी काळ्यावर पांढरे करण्याची!
एकंदरीत व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषेचा मागोवा घेत व्याकरणाला जावे लागते. हे मो. रा. वाळंबे यांनी मांडलेले मत किंवा फास्टफूडच्या आणि एसएमएसच्या जमान्यात कोणत्याही क्षेत्रातला खोल अभ्यास करण्याची सवय वा सवड नसलेल्यांनी पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे साहित्य का? याचा खोल विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.