- स्वयंसिद्धा प्रियानी पाटील
सारं शांत वातावरण असतानाच कुणीतरी येऊन दहावीच्या क्लासच्या दरवाजाची कडी वाजवली. सरांनी दरवाजा उघडताच एक कॅमेरामन पुढे आला आणि त्याने पटापट साऱ्यांचे फोटो काढले. कुणालाही काही कळेना. सारेच भांबावले.
मध्यंतरी असे काही चित्रपट निघाले की, ते अगदी शाळेतील कोवळ्या बालमनांवर परिणामकारक ठरतील की काय असेच वाटून जाणारे ठरले. शाळेमधील अवघ्या तेरा-चौदा वयातलं हे प्रेम दर्शवणारे चित्रपट म्हणजे पालकांच्या काळजाचा ठोकाच चुकविणारे. हे चित्रपट पाहिल्यावर शाळेतील मुलांचं काय? हा प्रश्न उद्भवल्यावाचून राहिला नसेल. आता पिढी प्रगत होत चालल्याने असा मोकळे-ढाकळेपणा चालायचाच. पण त्या आधीच्या पिढीचे काय?
…तर शाळेमध्ये वारंवार नापास होऊन राहिलेल्या मुलांमध्ये असा हुल्लडपणा पाहता, शिक्षण नववीपर्यंतच येऊन थांबायचे. दहावीच्या निकालावर त्याचा परिणाम होईल, असा निकष असायचा आणि ती मुलं मग नववीतूनच शाळा सोडायची. रवीच्या बाबतीतही तेच झालं, त्याच्या हुल्लडबाजीमुळे रवीचा ‘रव्या’ कधी झाला, हे त्यालाही कळलं नाही. नववीपर्यंत कसाबसा गाठलेला कळस दहावीत जाताना कोसळला, पुन्हा मग नववीतच कसं बसणार? म्हणून मग शाळाच दिली सोडून, तरी त्याचं अधूनमधून शाळेच्या ओढीने शाळेत येणं-जाणं वाढलं. शिक्षकांना काही नाश्तापाणी लागलं, तर हाच आणून देई. कुणाचा बाजारहाट हाच करी. अधे-मध्ये शिपाई नसला, तर हाच ते काम करे. शाळा भरायची वेळ गाठून शाळा सुटेपर्यंत शाळेतच रेंगाळत राही. खरं तर रव्या तसा चार-पाच वेळा नापास होऊन कसाबसा नववी गाठलेला होता. पण त्याचं असं येणं-जाणं वाढलेलं पाहून शिक्षकांना शंका येऊ लागलेली. त्याला ते म्हणाले, ‘रव्या शाळा सोडून देऊन रोज शाळेत कशापायी येतोस? त्यापेक्षा नववीच्या वर्गात बस की, पास झालास, तर •मॅट्रिक होशील पुढल्या वर्षी. वय पण वाढत जातं की…! त्यांचं बोलणं त्याच्या काळजाचं पाणी करणारं होतं. रव्या त्यानंतर अधूनमधून शाळेत एंट्री घेऊ लागलेला. शाळेत आला की, बाकी दहावीच्या त्याच्या फ्रेंडना भेटून आपण वयाने आणि मानाने सगळ्यात मोठे म्हणून दादापेक्षा दहावीच्या वर्गाचा मुख्यमंत्री असल्यासारखा वागू लागलेला. नववी पास होऊन तो दहावीत गेला असता, तर तोच मुख्यमंत्री झाला असता. याची त्याला रुखरुख होतीच. पण हा सारखा-सारखा शाळेत येऊ लागलेला पाहून सगळ्यांच्याच मनात पाल चुकचुकलेली. शिक्षकही कुजबुजू लागलेले. त्याचं हे असं विनाकारण शाळेत येणं पाहून एके दिवशी शाळेच्या नोटीस बोर्डवर बाहेरच्या माणसांना शाळेत नो इंट्रीची सूचना लिहिलेली पाहून रव्याचं पाणी झालं. सूचना वाचताना त्याचे डोळे पाणावले. तो सगळ्यांना म्हणाला, ‘एकदाच शेवटचं येऊन जाईन शाळेत, मग नाही येणार’ सगळे मित्र त्याला भेटले आणि रव्या जो निघून गेला तो पुन्हा काही बरेच दिवस तरी दिसलाच नाही कुणाला. नंतर मुख्यमंत्री निवड आणि बरेच कार्यक्रम आणि अभ्यास, परीक्षा, एक्स्ट्रा क्लास असं काहीसं वातावरण असतानाच शाळेतील सरांची मुलगी उमा अस्वस्थ दिसू लागलेली. अभ्यासात तिचं मन रमेनासं झालं. दहावीला येऊन हे असं वारंवार परीक्षेत नापास होणं म्हणजे, हिला नववीतच ठेवली असती, तर बरं झालं असतं, असं सरांनाच वाटून गेलं. काहीही करून हिला दहावीला पास व्हावंच लागणार. एक जरी कुणी नापास झालं, तर रिझल्टवर परिणाम होणार होता. पण ही काही पास होईना. शेवटी हिला परीक्षेलाच न बसविण्याचा निर्णय घेतला गेला आणि ही शाळेतच यायची बंद झाली. शिक्षकांची मुलगी आणि शाळेत येत नाही, याचं दुःख सगळ्यांनाच झालं, सरही काहीसे टेन्शनमध्ये आले.
त्यानंतरचा परीक्षेचा काळ सगळ्यांनाच अभ्यासात गुंतवणारा ठरला. जो तो आता सारं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करू लागलेला. एकामागोमाग एक परीक्षा देता देता एका पेपरच्या वेळी शाळेच्या परिसरात सारं शांत वातावरण असतानाच कुणीतरी येऊन दहावीच्या क्लासच्या दरवाजाची कडी वाजवली. सरांनी दरवाजा उघडताच एक कॅमेरामन पुढे आला आणि त्याने पटापट साऱ्यांचे फोटो काढले. कुणालाही काही कळेना. सारेच भांबावले, ‘काय चाललंय काय?’ म्हणून सर पुढे सरसावले आणि पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रव्या आणि उमाची जोडी विवाह उरकून थेट सरांचा आशीर्वाद घेण्यासाठी शाळेतच दाखल झालेली पाहून सरांच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला. त्यांना घाम फुटला. रुमालाने घाम पुसत-पुसत त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं, तर क्लासमध्ये पेपर अर्धवट टाकून सारे चर्चेतच गुंतले. रव्याचा फोटोग्राफर तर मधे-मधे फोटो काढून लुडबूड करू लागला. रव्या नवरदेवाच्या वेशात जरा आवेशात येऊनच साऱ्या मुलांपुढे फुशारकीने फोटो काढून घेत असलेला पाहून सरांनी न राहवून स्वतःवर पूर्ण संयम ठेवून त्याला तिथून निघून जायला सांगितलं. पण रव्याच्या आठवणी शाळेच्या गेटपासून बोर्डापर्यंत असल्याने त्याने उमासोबत पटापट फोटो काढून घेतले. आता, राहिला होता तो फक्त सरांचा आशीर्वाद. मात्र तो मिळेपर्यंत पोलिसांची गाडीच गेटवर येऊन उभी राहिली. रव्याला लग्नाचा आहेर आणि आशीर्वादाची सोय सरांनी अशा प्रकारे केलेली पाहताच आता त्याची रवानगी पोलिसांच्या गाडीत, तर उमा सरांच्या ताब्यात, अशी अवस्था बघून लग्नाचं वय कोवळं आणि परीक्षेचं असतानाही उमाचं हे धाडस पाहून सरांचीच मान खाली झुकली. पोलिसांना पाहून फोटोग्राफरही आपला कॅमेरा जप्त होईल, या भीतीने तिथून पळाला.
दरम्यान शाळेतलं हे प्रेम पाहता रव्याच्या नशिबी उमा नव्हती आणि रव्याच्या प्रेमालाही उपमा नव्हती, हे शेवटी सिद्ध झालं.