महाराष्ट्रातले व्याघ्र पर्यटन

Share
  • प्रासंगिक : डॉ. श्वेता चिटणीस

नागपूरच्या आजूबाजूला इतकी समृद्ध जैवविविधता असलेली स्थळे आहेत की, त्या स्थळांचा देशालाच नव्हे, तर जगभर अभिमान वाटावा. इथे दाट जंगलाने समृद्ध केलेले वाघ व इतर लहान प्राणी अशी इथली मुबलक जैवविविधता आहे. त्यामुळे या जंगलांमध्ये व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत. इथले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बोराच्या जास्त प्रमाणात असलेल्या झाडांमुळे ज्याला bor wildlife sanctuary असे नाव देण्यात आले आहे. तो सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्पसुद्धा विदर्भातच आहे. या सर्व जंगलांमध्ये वाघ दिसण्याची शक्यता दाट आहे. ताडोबा इथे सहसा वाघ दिसला नाही, असे होत नाही. त्यामुळे पर्यटक विन्मुख परत येत नाहीत.

महत्त्वाचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी सफारीचे आरक्षण करताना जीपमध्ये बसणाऱ्या सर्व पर्यटकांची नावे ऑनलाइन देणे गरजेचे आहे. जो कोणी ऑनलाइन आरक्षण करतो तो त्याच्या नावावर सफारीसाठी वाहन आरक्षित करतो; परंतु ज्याचे नाव तोच त्या वाहनात जाऊ शकतो, असा नियम अनेकांना माहीत नसतो व पूर्ण सहल रद्द होते. आम्हाला हा नियम माहीत नव्हता, त्यामुळे आमची ताडोबाची सहल रद्द करावी लागली. कारण आरक्षण झाल्यावर कोणाचीच नावं घालता येत नाही. अनेक पर्यटकांचे व वनखात्याचे बाचाबाचीवर प्रकरण येते. जंगल परिसरात राहण्यासाठी ऑनलाइन आरक्षण करावे लागते.

वाघांची संख्या वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्याघ्र प्रकल्पांचे कौतुक केले आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात वाघ, सिंह, चित्ते, बिबटे, पुमा नावाचा चित्त्यासदृश प्राणी, हिमबिबटे या सर्वच प्राण्यांचे संवर्धन करण्यात येईल. सध्या भारतात वाघांची संख्या २०२२ साली झालेल्या गणनेनुसार ३१६७ इतकी आहे. यावरून व्याघ्र प्रकल्प यशस्वी झाले आहेत, असेच म्हणता येईल. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा जवळजवळ ४०००० वाघ होते; परंतु १९७२ साली प्रथम वाघांची गणना केल्यावर फक्त २ हजारांपेक्षा कमी वाघ आढळले. त्यामुळे वाघांची सुरक्षा करण्यासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ हा प्रकल्प भारतात १९७३ सालापासून राबवण्यात येतो आहे.

मोगलपूर्व काळात प्रत्येक राज्यातील जंगलात भरपूर वाघ असायचे; परंतु मोगल काळात व त्यानंतर ब्रिटिश काळात वाघांची शिकार करणे म्हणजे शौर्याचे प्रतीक मानले जात असे. ब्रिटिशांची शिकारीला जाण्याची मोहीम व त्याचे साग्रसंगीत वर्णन आपण अनेक इंग्लिश पुस्तकांमधून वाचतो; परंतु त्यात एक वाघ मारण्यासाठी ते अनेक मनुष्यप्राणी सोबत नेत असत. जंगलाचा जाणकार माणूस, प्राण्यांचे वर्तन माहीत असणारा माणूस, वाघाला शिकाऱ्यापर्यंत पिटाळून आणणारा असे अनेकजण शिकार करणाऱ्या साहेबांच्या भोवती असायचे. त्यात काही भारतीय आयुष्य गमावून बसले, ज्याची नोंद कोणीच ठेवली नाही. वाघाला घाबरून, अनेकांच्या मदतीने त्याची भ्याडपणे हत्या करणे व स्वतःस शूरवीर म्हणवणे ही संस्कृती आपली नव्हेच; परंतु यामुळे वाघांची संख्या रोडावली. भारतात बंगाली वाघ किंवा रॉयल बेंगाल टायगर ही वाघाची प्रजाती आढळते. ब्रिटिश सर्वात प्रथम भारतात स्थायिक झाले, तेव्हा बंगाल राज्यात त्यांनी बस्तान बसवले. तिथे आढळणाऱ्या वाघाचे नामकरण ‘रॉयल बेंगाल टायगर’ असे त्यांनी केले. आजही भारतीय वाघ हा बंगाली वाघ याच नावाने ओळखला जातो. या देखण्या वाघाला पाहण्यासाठी भारतीय तसेच परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने व्याघ्र प्रकल्प असणाऱ्या जंगलांना भेट देतात. व्याघ्र पर्यटनाचा भारतात मोलाचा वाटा आहे.

या वर्षी भारताच्या ‘प्रोजेक्ट टायगर’ या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ५० वर्षांत वाघांची संख्या वाढवण्यात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वाघांची गणना दर ४ वर्षांनी भारतात National tiger conservation authority (NTCA) व Wildlife Institute of India (WII), व्याघ्र संवर्धनासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर संस्था व त्या राज्यांतले वन विभाग असे मिळून काम करतात. व्याघ्र प्रकल्पास ५० वर्षे पूर्ण झाली असून पंतप्रधानांनी जगभरातल्या ९७ देशांसोबत ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ या योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर वाघांचे संरक्षण व संवर्धन होईल.
भारतात वाघ देवीचे वाहन असल्यामुळे पूजनीय आहे. शक्तीचे प्रतीक आहे. अनेक पुराणकथांचे मुख्य पात्र आहे. तरीही वाघांची शिकार अवैध मार्गांनी करणारे लोक, त्यांची पिल्ले जाळ्यात पकडून तस्करी करणारे लोकही आहेत; परंतु महाराष्ट्रात अनेक वन विभागांत जंगलातील आदिवासी, तस्करी करणाऱ्या लोकांनाच प्रशिक्षण देऊन त्यांचे मतपरिवर्तन करून रोजगार मिळवून देण्याचे कार्य केले आहे. स्थानिक रहिवाशांना ecotourism व जंगलातील सफारीचे गाइड बनण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अवैध शिकार, तस्करी होत नाही. वाघ हा प्राणी जंगलातील भक्षक प्राण्यांमध्ये सर्वात उच्च स्थानावर आहे. त्यामुळे तो इतर हरीण, सांबर, नीलगाय, ससे, मोर इ. छोट्या प्राण्यांचे भक्षण करतो व त्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू देत नाही. झाडं व वनस्पती खाणारे प्राणी वाढले, तर तेच जंगल फस्त करतील व त्या परिसंस्थेचा तोल सावरणे कठीण होईल. झाडं कमी झाली, तर त्यावर जगणारे प्राणी कमी होतील आणि वाघांना भक्ष्य मिळेनासे होईल. जंगल नष्ट झाले, तर पाऊस कमी होईल. त्यामुळे वाघ वाचवणे म्हणजेच जंगल वाचवणे व जंगल वाचले, तर इतर छोटे प्राणी, पक्षी, कीटक इ. जैवविविधता वाचेल व हवामान बदलाचा त्रास कमी होईल, दुष्काळ पडणार नाही, कारण झाडांमुळे बाष्प तयार होऊन पाऊस पडेल. त्यामुळे वाघ वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. वाघ आपले भक्ष्य अचूक शोधतो. माणूस, बकऱ्या किंवा इतर छोटे प्राणी त्याचे भक्ष्य नव्हेत. मुळात वाघ दाट जंगलात राहणारा प्राणी आहे; परंतु माणूस जर त्यांचे अधिवास नष्ट करत सुटला, तरच ते मनुष्यवस्तीत शिरतात. गुरांना भर जंगलात चरायला नेले तरच तो गुरांवर हल्ला करतो. त्यामुळे काही गुराखी इतर गावकऱ्यांना सोबत घेऊन वाघावर विषप्रयोगही करत असत. मनुष्यप्राणी वाघाच्या अधिवासात शिरतो व वाघ हल्ला करतो म्हणून बोंब ठोकून त्याला मारायला धजावतो. पूर्वी भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी अपल्या मनात भीती रुजवली व त्या भीतीने असे विकट स्वरूप घेतले. पण व्याघ्र प्रकल्पांमुळे वाघाला अभय आणि अभयारण्य मिळाले आहे. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे व त्याला जपणं आपलं कर्तव्य आहे. पूर्वी मनुष्यप्राणी गुहेत राहत असे. मग त्याने नदीकाठच्या जंगलांमध्ये वस्ती केली. हळूहळू जंगलतोड करून राहण्यासाठी जागा बनवली. आजही ती अश्मयुगी सवय सुरूच आहे. आजही मानव जंगल तोडून इमारती बांधतो. भीती घालवण्यासाठी काही ब्रिटिश वैज्ञानिकांनी वाघाच्या वागणुकीचे, त्याच्या आक्रमण करण्याच्या शैलीचे अवलोकन सुरू केले. मुक्या प्राण्यांच्या मनात काय चालले आहे? हे जाणून घेण्यासाठी तासनतास, दिवस, आठवडे व महिने झाडावर राहून अवलोकन करावे लागते. या अवलोकनातून वाघाच्या वागण्याच्या छटा उलगडत गेल्या.

मुळात वाघ आपली सरहद्द राखतो. या सरहद्दीत त्याचे राज्य असते. होय वाघ एकटे राहणे जास्त पसंत करतो. वाघीण तिच्या बछड्यांबरोबर राहणे जास्त पसंत करते. बछडी ६ महिन्यांची असेपर्यंत त्यांची काळजी घेते. त्यांना एकटे सोडत नाही, त्यांना संकटांपासून वाचवते. त्याला सोडून ती फक्त एखाद्या प्राण्याची शिकार करून आणण्यासाठीच दूर जाते. वाघाची पिल्ले ही जन्मत:च अंध असतात; परंतु त्यांच्या अंगावर पट्टे नक्कीच असतात. हळूहळू त्यांची दृष्टी विकसित होऊ लागते. मोठे झाल्यावर तेही आपल्या पालकांसारखे शिकार करू लागतात. अनेकदा भर दिवसा वाघ आपल्याच परिसरात राहतात व थोडासा प्रकाश कमी होताच किंवा रात्री ते शिकारीसाठी पुन्हा बाहेर पडतात. अशा वेळेस त्यांची कर्णेंद्रिय त्यांना सगळीकडचे आवाज ऐकून शिकारीसाठी प्राणी कुठे सापडेल याची सूचना देत असतात. वाघांची दृष्टीही रात्रीच्या अंधारात शिकार करण्यासाठी विकसित झालेली असते. वाघीण आपल्या पिल्लांसोबत राहते व वाघ मात्र एकटा राहणे जास्त पसंत करतो. पिल्लांच्या संगोपनात वाघिणीचा मोठा वाटा असतो. पिल्लांसोबत खेळणे, त्यांना खाद्य भरवणे त्यांचे रक्षण करणे हे सर्व वाघीण एकटी पार पाडते. पिल्ले मोठी झाल्यावर तीसुद्धा आपापले राज्य थाटतात व वाघीणही आपली दिशा निवडते. व्याघ्रराज सहकुटुंब क्वचितच आढळतात.

अभयारण्यात वाघ निर्भयपणे फिरू शकतात. वाघीण व पिल्ले एकमेकांशी खेळताना बघणे यासारखा आनंद प्राणीप्रेमींना कोणता असेल? आणि हे सर्व त्यांच्या परिसरात जवळ जाऊन पाहणे खूपच अल्हाददायक आहे. अभयारण्ये सुरक्षित आहेत म्हणून व्याघ्र पर्यटनाचा आनंद आपण मनमुराद घेऊ शकतो अन्यथा शहरातील प्राणिसंग्रहालयात अतिशय हतबल झालेला, चिडलेला, कंटाळलेला व अस्वस्थपणे येरझारा घालणारा वाघ पाहावा लागला असता. वाघ केवळ प्राणिसंग्रहालयात बघायला लागू नये यासाठी त्याचा अधिवास अर्थात जंगल जपायला हवे.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

32 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

40 minutes ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago