- क्राइम : अॅड. रिया करंजकर
कायद्यानुसार आपल्या घरात किंवा आपल्या शेतात जर एखाद्याच्या जागेवरून रस्ता जात असेल, तर त्या जागेवाल्याला तो रस्ता किंवा पायवाट द्यावीच लागते.
धना व संतोष या दाम्पत्याने बँकेकडून लोन करून घर विकत घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी घराची शोधाशोध सुरू केली. समुद्राच्या आसपास त्यांना तसं घरही सापडलं. घरमालकाला ते घर विकायचं होतं आणि साधना संतोष घराच्या शोधात होते. त्यामुळे घर मालक आणि साधना संतोष यांच्यामध्ये घराबद्दल व्यवहार होऊन कागदपत्रे तयार करण्यात आली. साधना यांनी घेतलेलं घर हे मागच्या बाजूला असल्यामुळे घरमालकाने मेन रस्त्यावरून त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक पायवाट दिली. साधना हिला जी पायवाट दिली, त्या पायवाटेचे पैसेही मालकाला दिले व घराच्या घर पावतीबरोबर त्या रस्त्याचे हे पैसे ती टॅक्स म्हणून भरत होती. तशी मालकाने आणि साधनामध्ये त्या रस्त्याबद्दल कागदपत्र केलेली होती. त्या रस्त्याच्या बाजूला एक घर होतं. तेही मालकाने विकलं. मालक जिवंत असेपर्यंत ज्या नवीन लोकांनी ते घर विकत घेतलं होतं. ते देसाई कुटुंब शांत होतं. त्या पायवाटेवर आणि त्या देसाईंच्या घरात ज्या साईडला वायरीचे लांब कुंपण घालण्यात आलं होतं. त्याच्या कुंपणाच्या त्या साईडला देसाई यांचं घर होतं. पण देसाई हळूहळू आपली जागा वाढवण्याचे प्रयत्न करत होते. मालक जिवंत असल्यामुळे ते त्यांना फारसं जमत नव्हतं. मालकाचे निधन झाल्यावर देसाई कुटुंब ते कुंपण पुढे-पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागले.
साधना हिने नगरपालिकेची परमिशन घेऊन तेथे विटांची पक्की भिंत बांधली व जिथून एन्ट्री केली जाते तिथे गेटही बांधले. याच्यावरून देसाई आणि साधना यांच्यामध्ये कडाक्याची भांडणं झाली. देसाई कुटुंब सांगू लागले, ‘ही रस्त्याची जागा आमची आहे. मालकांनी ती आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे तू भिंत घालू शकत नाही. मालकांनी जागा मला दिलेली आहे. कागदपत्रावर तशी केलेली आहे. नकाशाही माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्या पायवाटेचा टॅक्स मी भरत आहे. तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत, ते दाखवा.’ देसाई कुटुंब बोलले.
‘आमच्याकडे कागदपत्रे नाहीत. पण मालक बोलला होता.’ साधना सांगू लागली,
‘मालक तुम्हाला बोलला होता. पण माझ्याशी त्याने व्यवहार केला होता आणि एवढेच नाही, तर मी तुमच्या अगोदर दहा वर्षे इथे राहायला आलेले आहे आणि तुम्ही नंतर रूम घेतलेला आहे.’ देसाई कुटुंब ऐकायलाच तयार नव्हते. तिची भिंत तोडायला त्यांनी सुरुवात केली. साधना हिने पोलीस कम्प्लेंट केली. त्यांची मुलं साधना आणि तिच्या मुलांवर धावून गेली. एवढेच नाही, त्यांची मुलगी मोठ्या मोठ्याने बोंबा मारायला लागली, जगाला सांगेन तुमच्या मुलाने माझ्यावर बलात्कार केलेला आहे. तुम्हा सर्वांना मी जेलमध्ये पाठवीन अशी धमकी देसाईची मुलगी साधनाच्या कुटुंबाला देऊ लागली. एवढेच नाही, तर देसाई यांचा मुलगा साधना यांच्या मुलीला येता-जाता व रस्त्यावर छेडू लागला. आणि ऊठसूट साधनाशी भांडण करू लागला. त्याने गेट बंद असताना हातोड्या आणून ते गेट तोडण्याचा प्रयत्न केला. साधना हिने सगळे पुरावे करून पोलीस स्टेशन गाठले पोलिसांकडे अनेक कम्प्लेंट्स केल्या. पण पोलीस काही या गोष्टींमध्ये लक्ष घालेनात. पोलीस स्टेशनमधून सांगण्यात येत होते, ‘तुम्ही नगरपालिकेकडे जा आणि तो रस्त्याचा प्रश्न सोडवा’ आणि नगरपालिका सांगत होती, ‘तुम्ही पोलीस स्टेशन बघा मग आम्ही बघतो’ साधना या दाम्पत्यांना इकडून तिकडून फक्त नाचवलं जात होतं.
या सर्व त्रासाला कंटाळून साधना यांनी वकिलांचा सल्ला घेण्याचा ठरवला व वकिलांनी त्यांना फंडामेंटल राईटसाठी लढण्याचा सल्ला दिला.
आपल्या घरात किंवा आपल्या शेतात जर एखाद्याच्या जागेवरून रस्ता जात असेल, तर त्या जागेवाल्याला तो रस्ता किंवा पायवाट द्यावीच लागते. कायदा सांगतो त्या कायद्याचा फायदा घेण्यासाठी साधना यांना सुचवण्यात आले.
साधना यांनी आपली घरदुरुस्ती केली आणि घरावर पत्रे टाकले. घरावर पत्रे टाकले म्हणूनही देसाई कुटुंब भांडायला गेलेलं होतं. म्हणजे साधनाने स्वतःच्या घरात काही केलं की, देसाई कुटुंबं जाऊन तिथे भांडण करत असे किंवा नगरपालिकेला लेटर लिहून कळवत असे, असा नको तो त्रास देसाई कुटुंब साधना यांना देत होता आणि पायवाट जमीन जी दोन फूट होती, ती दोन फूट जमीन त्यांना स्वतःच्या घराच्याअंतर्गत काबीज करायची होती म्हणून हे सर्व कारस्थान देसाई कुटुंब रचत होतं. मालक असेपर्यंत त्यांनी शांतपणे घेतलं आणि मालक गेल्यानंतर त्यांची खरी नाटके सुरू झाली.
साधनाने मागच्या साईडचे घर विकत घेतलं होतं, कारण मालकाने त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी वाट दिलेली होती म्हणून ते घर त्यांनी विकत घेतलं होतं, जर घरापर्यंत जायला वाटच नाही, तर ते घर त्यांनी विकत घेतलं असतं का?
(सत्यघटनेवर आधारित)