Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजतो आम्रवृक्ष एक

तो आम्रवृक्ष एक

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

दादूने लावलेला भोपळ्याचा वेल नामशेष झाला आहे. सदूच्या अंगणात आंब्याचा वृक्ष डौलात उभा आहे.

सदू आणि दादू दोन मित्र… गावात शेजारी शेजारी राहणारे. एकाच शाळेत सातवीच्या वर्गात एकत्र शिकणारे दोन किशोरवयीन मुलगे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळेतल्या गुरुजींनी वर्गातल्या सगळ्या मुलांना आपापल्या घराच्या अंगणात एक झाड लावायला सांगितलं. प्रत्येकाने एक झाड लावायचं. त्याची निगराणी करायची. सदू आणि दादू दोघांनी आपापल्या घरासमोरच्या अंगणात खड्डे खोदले. सदूने आंब्याची कोय पुरली आणि दादूने भोपळ्याच्या काही बिया खड्यात टाकल्या. पावसाळा असूनही दोघांनी सकाळ संध्याकाळ तिथं लोटाभर पाणी घालण्याची दक्षता घेतली. चार महिने लोटले आणि…

दादूने पेरलेल्या भोपळ्याचा वेल तरारून वर आला. त्याला फुलं आली, त्या फुलांतून छोटे-छोटे भोपळेही दिसू लागले. हां हां म्हणता ते भोपळे भले मोठ्ठे झाले. दिवाळीच्या सुमारास गुरुजींनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांनी लावलेली झाडं पाहिली. दादूच्या अंगणातल्या भोपळ्याच्या झाडाचं कौतुक केलं. त्याला पहिलं बक्षीस मिळालं. सदूने खड्ड्यात पुरलेल्या कोयीतून जेमतेम फुटभर झाड उगवलं होतं. दोन-चार तांबूस पानं तेवढी दिसत होती. त्या झाडाचं कुणीही कौतुक केलं नाही.

सदू हिसमुसला. पण… पण त्याने आपली चिकाटी सोडली नाही. तो त्या झाडाला पाणी घालत राहिला. झाडाला इजा होऊ नये म्हणून त्याने त्याभोवती एक कुंपणही घातलं….

दिवस पुढे पुढे सरकत होते. सदू झाडाची काळजी घेत होता. झाड संथगतीनं वाढत होतं. पुढे सदूने त्या झाडावर हापूस आंब्याची कलमं केली. त्यांचीही काळजी घेतली. वेगवेगळी खतं घातली. नियमित पाणी घातलं. हां हां म्हणता काही वर्ष उलटली. सदू आणि दादू दोघेही शालांत परीक्षा पास होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागले. तिथलं शिक्षण पूर्ण करून कामाधंद्याला लागले. दोघांचीही लग्नं झाली. मुलंबाळं झाली. ती देखील मोठी झाली. त्यांचीही शिक्षणं – लग्नकार्य झाली.

आज… आज सदू आणि दादू दोघेही साठीच्या घरात पोहोचले आहेत. दादूने लावलेला भोपळ्याचा वेल कधीच नामशेष झाला आहे. किंबहुना आपण सातवीच्या वर्गात असताना भोपळ्याचा वेल लावला होता हे स्वतः दादूला देखील आठवत नाही. पण…

सदूच्या अंगणात मात्र आंब्याचा एक डेरेदार वृक्ष डौलात उभा आहे. सदूनं त्याच्याभोवती एक चांगला पक्का पार बांधून घेतला आहे. चैत्र महिन्यात तो वृक्ष मोहरतो. त्यानंतर दोन-चार महिन्यात त्यावर आंबे लागतात. आसमंत त्या फळांच्या घमघमाटानं दरवळतो. त्या झाडावरून कोकिळेची कुहूकुहू ऐकू येते. अनेक वाटसरू सावलीसाठी त्या झाडाच्या पारावर विसावतात. सदू त्या आंब्याच्या झाडावर येणारी सगळी फळं काढून पिकवतो आणि शाळेतल्या मुलांना वाटतो. अभिमानानं सांगतो की, मी शाळेत असताना लावलेल्या झाडाची ही फळं आहेत.

वर सांगितलेली ही कथा केवळ काल्पनिक कथा नसून सत्य घटना आहे. केवळ नजीकच्या कालखंडाचा विचार न करता एखाद्या घटनेचे दूरगामी परिणाम कसे होऊ शकतात, याचं हे उत्तम उदाहरण. केवळ आजचा फायदा पाहणारे आणि दूरदृष्टी नसलेले अनेक तरुण आपल्या आजूबाजूला पाहतो. पाचशे-हजार रुपये अधिक मिळतात म्हणून सहा-आठ महिन्यांनी नोकऱ्या बदलणारे. या धंद्यात जम बसत नाही म्हणून वारंवार धंदा बदलणारे… झटपट यश मिळवायच्या मागे लागलेले… या मानसिकतेचा फायदा काही धूर्त माणसं बरोब्बर उचलतात. सहा महिन्यांत पैसे दुप्पट करून देणाऱ्या फसवणुकीच्या अनेक योजना निघतात. सुरुवातीला काही जणांना त्यांचे पैसे दुप्पट करून दिले जातात पण पुढे… शेअर मार्केटमधेही योग्य अभ्यास न करता केवळ कुणीतरी दिलेल्या टिपवर पैसे गुंतवताना सामान्य माणसांचे पैसे बुडतात. वरच्या भावात खरेदी केलेले नको ते शेअर गळ्यात पडतात आणि पुन्हा तो दर कधीच येत नाहीत.

झटपट बॉडिबिल्डिंगसाठी आणि वजन कमी करण्यासाठी औषधं गोळ्या इंजेक्शनचे दूरगामी परिणाम काय होतात हे सांगायला नको. सामान्य माणसांना मात्र अशा प्रकारच्या झटपट यशाचं
अप्रूप वाटतं.

शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांतही हाच प्रकार पाहायला मिळतो. परीक्षेच्या बाबतीत तर असले अनेक प्रकार बघायला मिळतात. पाठ्यपुस्तकाला हातही न लावता केवळ गाईड आणि कुठल्या तरी क्लासच्या नोट्स वाचून परीक्षेपुरता अभ्यास करून जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना डिग्रीचं सर्टिफिकेट मिळालं तरी त्यांना त्या शिक्षणातून मिळणारं ज्ञान मात्र कधीच मिळत नाही. ग्रॅज्युएट झालेल्या अनेक माणसांना साधे साधे फॉर्मदेखील भरता येत नाहीत. कुठे साधी तक्रार करायची म्हटलं तरी पत्र लिहायला जमत नाही.

परीक्षेत मार्क मिळवणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर त्या परीक्षेसाठी योग्य तो अभ्यास करून मिळवलेलं ज्ञान अधिक महत्त्वाचं आहे. मार्क सर्टिफिकेटवर राहतात. ज्ञान मात्र कायम सोबत करतं.
मार्क म्हणजे दादूनं लावलेला भोपळ्याचा वेल आणि ज्ञान म्हणजे सदूनं लावलेलं आंब्याचं झाड. वर्षानुवर्षं फळं देणारं. वादळवाऱ्याशी झुंजायची ताकद असलेलं. ताठ उभं राहून सर्वांना सावली देणारं. ससाळ मधुर फळ देणारं…

दूरदृष्टी न ठेवता केलेल्या कामाचे परिणाम अल्पकाळच टिकतात. आपल्याला जर दीर्घकालीन आणि निश्चित यश हवं असेल, तर त्यासाठी योग्य त्या योजना आखाव्या लागतात. त्यासाठी योग्य ती मेहनत करावी लागते.

जाता जाता एक किस्सा सांगतो. एक किशोरवयीन मुलगी. तिची आई गायिका होती. आईच्या तालमीत ही मुलगी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत होती. कंठातले सूर पक्के करत होती. एक एक राग पुन्हा पुन्हा आळवून तयार होत होती. या किशोरीला शांतारामबापूंनी ‘गीत गाया पथ्थरोंने’ या सिनेमासाठी गाणं गायला बोलावलं. अल्लड वयातली ती युवती हरखून गेली. आईला न सांगता कुठल्याशा गाण्याचं रेकॉर्डिंग करून आली. रेकॉर्डिंग झाल्यानंतर सगळ्यांनी तारीफ केल्यामुळे घरी आली ती थोडी हवेत तरंगतच… पण, तिच्या आईला ही गोष्ट कळली मात्र आणि… आईनं त्या किशोरीला तंबी दिली. ‘तुला जर सिनेमासाठी गायचं असेल, तर खुशाल गा. पण, यापुढं माझ्याबरोबर बसून गाऊ नकोस. माझ्या तंबोऱ्याला तुला हात लावू देणार नाही.’ त्यानंतर त्या मुलीनं आईची आज्ञा प्रमाणभूत मानून स्वतःला केवळ शास्त्रीय संगितासाठी वाहून घेतलं. सुरांवर हुकूमत मिळवली.

काळ लोटला… ती मुलगी मोठी झाली… केवळ वयानं नव्हे तर कीर्तीनं… जयपूर घराण्याची तालीम प्राप्त करून तिनं स्वतंत्र गायकी प्रस्थापित केली. तिची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहाता साऱ्या देशभर पसरली. देशाच्या सीमा ओलांडून जगभरात तिच्या नावाचा लौकिक दुमदुमला. त्यावेळी गझला, भावगीतं आणि सिनेमासंगीत न गाता केवळ शास्त्रीय संगीतात स्वतःला झोकून देणाऱ्या मुलीचं नाव सांगू?

ती मुलगी म्हणजे आपल्या गानसरस्वती किशोरी आमोणकर. मोगुबाई कुर्डिकरांची कन्या किशोरी… किशोरावस्थेत तिच्या बरोबरीनं गझला आणि भावगीतं गाणाऱ्या अनेक गायिकांची नावंसुद्धा कुणाला आठवत नाहीत, पण किशोरीताईंच्या गाण्याची कीर्ती आज त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र, रससिद्धांत यांचा समग्र अभ्यास करून किशोरीताईंनी ‘स्वरार्थरमणी’ हा लिहिलेला ग्रंथ आजही संगीतसाधनेतील एक मैलाचा दगड मानला जातो.

हे सगळं घडलं याचं कारण म्हणजे किशोरीताईंनी त्यावेळी झटपट पैसा आणि प्रसिद्धी देणाऱ्या गाण्याचा त्याग केला म्हणूनच… आपण आपल्या आयुष्यात कसं वागायचं? सहा महिन्यांत वाढणारा भोपळ्याचा वेल लावायचा की, पिढ्या न पिढ्या फळ देणारं आंब्याचं रोपटं लावायचं? झटपट मिळणाऱ्या यशाच्या मागे धावायचं की, दीर्घकाळ साथ देणाऱ्या ध्येयाची कास धरायची हे आपलं आपणच ठरवायला हवं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -