Monday, May 12, 2025

कोलाज

स्मरण चित्रपटसृष्टीच्या जनकाचे...

स्मरण चित्रपटसृष्टीच्या जनकाचे...

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची रविवार ३० एप्रिलला जयंती आहे. ज्या काळात केवळ नाटक आणि लोककलेच्या माध्यमातूनच भारतीयांचे मनोरंजन केले जात होते, त्याच काळात दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करून दिली. धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपट निर्मिती करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घरातील वस्तू, तसेच स्वत:च्या पत्नीचे दागिने देखील विकले. दादासाहेब फाळके यांचा चित्रपट निर्मितीचा हा प्रवास नंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला आहे. ‘लाईफ ऑफ ख्रिस्त’ हा मुकपट पाहिल्यानंतर दादासाहेब यांच्यात चित्रपट निर्मितीची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना हा चित्रपट पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी देखील त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी साथ दिली. हे सर्व ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट भारतात २९ जानेवारी २०१० रोजी रिलीज झाला. त्याआधी २००९ मध्ये हा चित्रपट ‘ओशियन्स सिनेफॅन’ या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आले होते. या चित्रपटात दादासाहेब फाळके यांची भूमिका अभिनेते नंदू माधव यांनी साकारली. तर दादासाहेबांची पत्नी सरस्वतीबाई यांची भूमिका विभावरी देशपांडेने साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे.‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाने ५६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला. तर ४६ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने या चित्रपटाला गौरविण्यात आले. बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि रंगभूमी पुरस्कार हे देखील या चित्रपटाने पटकावले. या चित्रपटाचे देशभरात कौतुक झाले. सिनेमाचा अभ्यास करणारे विद्यार्थी हा चित्रपट आवर्जून पाहतात.

Comments
Add Comment