दुसऱ्या दिवशी जयेश सोडून साऱ्या बालवीरांनी खरी कमाईचे पैसे शिक्षकांकडे जमा केले. जयेश खाली हात असूनही जयेशला शिक्षकांकडून शाबासकी मिळाली. याचे साऱ्यांना कोडे पडले.
सारंगपूर नावाच्या एका गावात जयेश हा एका श्रीमंत, धनाढ्य सावकाराचा मुलगा सारंगपूरच्याच ज्योती विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होता. आठव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बालवीर हा ऐच्छिक विषय घेता येत होता. आठव्या वर्गाच्या सुरुवातीलाच एक दिवस वर्गात स्काऊटच्या शिक्षकांनी बालवीरांची तत्त्व, कर्तव्ये, महत्त्व, अभ्यासक्रमाची रूपरेषा वगैरे साऱ्या गोष्टी नीटपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. जयेशला हा विषय खूप आवडला. त्याने हा विषय घेतला आणि जयेश बालवीर बनला.
जयेशसोबत त्याचे मित्रही बालवीर झाल्याने त्या सर्वांचा मिळून एक संघच तयार झाला. संघनायक अर्थात जयेशलाच नेमण्यात आले; परंतु थोड्याच दिवसांत त्याच्या अंगची हुशारी व धडाडी पाहून शिक्षकांनी जयेशला पथकनायक बनविले आणि त्यांच्या संघातील सोमूला संघनायक केले. शाळेत दर आठवड्यातून दोन तास असे जयेशचे बालवीर शिक्षण सुरू झाले. जयेशला बालवीर शिक्षणातील गाणे-गर्जना, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, खेळ-मेळावे, प्रवास-सहली, त्यात माग काढण्याच्या खुणा, शिट्ट्यांचे इशारे, निरनिराळे संदेश ओळखणे, शेकोटीचा कार्यक्रम, निसर्गनिवास, वननिवास, वनस्पती निरीक्षण, होकायंत्राविना दिशाज्ञान, हवामानाची माहिती, रात्रीच्या वेळी आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण, प्रथमोपचारांची माहिती, पोहण्याच्या सूचना, व्यायामांचे प्रकार, बुडत्याला वाचविणे, हेरगिरी, स्वत:च्या हाताने स्वयंपाक करण्याची अनोखी मजा आदी गोष्टी खूप आवडायच्या.
बालवीर शिक्षणातील अशा बहुविध रंजक उपक्रमांद्वारे मुलांच्या अंगच्या सुप्त कलागुणांना भरपूर वाव मिळायचा. प्रत्येक कार्यक्रमात आपला स्वत:चा सहभाग असून हे कार्यक्रम आपल्यासाठीच आहेत, ही भावना मुलांमध्ये निर्माण झाल्याने त्यांना खूप आनंद मिळायचा. त्यांचे मनोधैर्य वाढले, देशप्रेम वाढले. एकमेकांना सहकार्य करण्याची भावना वाढीस लागून मनाची कोती प्रवृत्ती निघून गेली. असे हे बालवीर शिक्षण. ज्यातून टक्केटोणपे खात आपला बालवीर जयेशसुद्धा घडत होता. जयेशने खूप विचार करून खरी कमाई काय करायची हे ठरविले.
त्याने शाळेतून आल्यावर आईला खऱ्या कमाईबद्दल सांगितले असता त्याची आई त्याच्या वडिलांना मागून त्याला पैसे देण्यास राजी झाल्या. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याचे वडीलसुद्धा त्याला पैसे द्यायला हो म्हणालेत. पण, जयेशने ते नम्रपणे नाकारले व आई-वडिलांना आपली योजना सांगितली. आपला जयेश हा आळशी व ऐतखाऊ फुकट्या नाही, हे बघून त्या दोघांनाही खूप आनंद झाला व त्यांनी त्याच्या योजनेस खुशीत संमती दिली.
गावाशेजारच्या माळरानावर बोरं, चिंचा, करवंद अशा गावरान मेव्यांची खूप झाडे होती. नेमका त्यावेळी चिंचांचा ऋतू सुरू होता.
जयेश झाडावर चढण्यात पटाईत होताच. तो प्रथम एखादे छोटेसे गाभुळलेले चिंचेचे लालचुटूक बाटूक सोलून आपल्या तोंडात टाकायचा. ते चघळत पिकलेल्या चिंचांच्या ज्या गुच्छांना हात पुरेल ती तोडून पिशवीत टाकायचा. नंतर ती फांदी खळखळ हलवायचा.
त्यामुळे पिकलेल्या चिंचा पटापट खाली पडायच्यात. खाली उतरून आपली पिशवी भरायचा व घराचा रस्ता धरायचा. अशा तऱ्हेने जमा झालेल्या चिंचा त्याने शनिवारला एका छोट्या मालवाहू मिनीडोरमध्ये टाकून बाजारला नेल्या. त्या बाजारात विकून आलेले पैसे खिशात नीट ठेवून एसटी बसने आपल्या गावला परत जाण्यासाठी बाजारातून बसस्टँडकडे निघाला.
तो थोडेसे अंतर चालून गेला, तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली त्याच्या गावचा फाटके-तुटके कपडे घातलेला एक अतिशय गरीब मजूर माणूस गुडघ्यात तोंड खुपसून रडत बसलेला त्याला दिसला.
जयेश त्याच्याजवळ गेला व आपुलकीने काय झाले काका? असे त्याला विचारले.
त्यानेही जयेशला ओळखले. जयेशला बघून तो जास्तच गहिवरून रडू लागला. जयेश त्याचे सांत्वन करीत म्हणाला, काका, काय झाले ते तर सांगा आधी. नुसते रडून काय होणार? हुंदके देत तो सांगू लागला, काय सांगू जयेश, माझं नसीबच फुटकं. तुही काकू लय बिमार हाय. आपल्या गावाच्या डाकतरनं लय मोठी औशीधं लिवून देल्ती. ते घेयाले पुया हप्त्याची मजुरी घिऊन आल्तो. पन माह्या फाटक्या कुडत्याचा खिसाच कुनं कापलां. हे पाय. समदे पैसे गेले. आता औशीधं कस्यानं घिऊ? घरात जहर खायाले बी पैसे नायी तं औशीधाले कुठून आनू भौ अन् तुह्या काकूले कसी काय बरी करू? काका तुम्ही काही रडू नका. माझ्याजवळ पैसे आहेत. चला आपण आधी औषधी घेऊ. जयेश म्हणाला.
पन जयेश, तुले तुहे बाबा रागोयतीन नं रे?
तुम्ही ती काळजी करू नका. द्या ती डॉक्टरांची औषधीची चिठ्ठी माझ्याजवळ आणि चला लवकर. जयेशने सांगितले.
डोळे पुसत पुसत तो माणूस उठाला. दुसऱ्या खिशातील चिठ्ठी जयेशच्या हातात दिली व गुपचूप जयेशच्या मागे चालू लागला. जयेशने जवळच्याच एका औषधाच्या दुकानावरून सगळी औषधे घेतली. त्या माणसाला सोबत घेऊन बसस्टँडवर आला. त्याचे एसटी बसचे तिकीट जयेशनेच काढले. त्याला घेऊन सारंगपूरला आला. एस. टी. बसमधून उतरल्यावर प्रथम त्या माणसाच्या घरी गेला. ती एक लहानशी झोपडीच होती ती. झोपडीत एका गोधडीवर त्याची बायको तापानं फणफणत कण्हत पडलेली होती. जयेशने त्याला डॉक्टरांनी लिहिल्याप्रमाणे सारी औषधे नीट समजावून सांगितली. आपल्या हाताने त्याच्या पत्नीला औषध दिले व झोपडीतून बाहेर पडला. घरी आल्यावर आईला त्याने संपूर्ण हकिकत सांगितली. आईला जयेशची परोपकारी वृत्ती बघून खूप आनंद झाला, पण पुन्हा मायेपोटी त्याच्या बालवीर निधीसाठी त्यांनी घरून पैसे देण्याचे जयेशला म्हटलेच; परंतु पुन्हा सुद्धा जयेशने ते नाकारलेच.
रविवारला पुन्हा तो नेहमीप्रमाणे चिंचा आणायला गेला, तर त्याच्यामागे तो गरीब माणूस त्याला येताना दिसला. जयेशने त्याला विचारले असता जयेशच्या स्काऊटच्या शिक्षकांकडून त्या माणसाला खरी कमाईबद्दलची माहिती मिळाल्याचे त्याने जयेशला सांगितले आणि गावचे सरपंच तुझ्याजवळील साऱ्या चिंचा विकत घेणार आहेत हेही सांगितले. त्या माणसाने जयेशला भरपूर चिंचा पाडून दिल्या. त्याने त्याच्याजवळच्या पोत्यात त्या चिंचा भरून ते पोते आपल्या डोक्यावर उचलून गावात आणले. सरपंचांनी त्या साऱ्या चिंचा विकत घेतल्या व ते जयेशला पैसे देऊ लागले. जयेशने नम्रपणे तेही नाकारले व त्या चिंचा ह्या गरीब माणसाच्याच कष्टाच्या आहेत, असे सांगून ते पैसे तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच गरीब मनुष्याला दिले. सरपंचाला जयेशचे खूपच कौतुक वाटले.
दुसऱ्या दिवशी सोमवारला जयेश सोडून साऱ्या बालवीरांनी खरी कमाईचे पैसे शिक्षकांकडे जमा केले. जयेश खाली हात असूनही जयेशला शिक्षकांकडून शाबासकी मिळाली. याचे साऱ्यांना कोडे पडले. मग शिक्षकांनीच त्या कोड्याचा उलगडा केला. ते म्हणाले, जयेशने नुसती खरी कमाईच केली नाही, तर ती सत्कारणीसुद्धा लावली. त्याने जरी बालवीरनिधीमध्ये पैसे टाकून भर घातली नाही तरी आपल्या साऱ्या बालवीर पथकाला भूषणावह व शाळेला अभिमानास्पद असे एक फार मोठे सत्कार्य केले आहे.
मग त्यांनी घडलेली घटना सांगताच सगळ्या बालवीरांना आनंद झाला व सगळ्यांनी टाळ्या वाजवून जयेशचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनीसुद्धा जयेशचे कौतुक केले.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…