Share
  • कथा : रमेश तांबे

आकाश खूप पुस्तके वाचायचा. शाळेच्या ग्रंथालयातील कितीतरी पुस्तके त्याने वाचून संपवली होती. त्याला भुताखेताच्या, राजा-राणीच्या, राक्षस, परीच्या गोष्टी खूप आवडायच्या. त्या गोष्टी वाचताना तो इतका दंग व्हायचा की, कसलेच भान त्याला उरत नसे. एके दिवशी तो असेच एक राक्षस अन् परीचे पुस्तक वाचत होता. अन् वाचता वाचता गोष्टीत हरवून गेला होता.

तेवढ्यात आईने त्याला हाक मारली, ‘आकाश जरा इकडे ये रे’ तशी त्याची तंद्री भंग पावली. पुस्तक तसेच हातात घेऊन तो आईकडे आला. आई म्हणाली, ‘मी बाजारात जाऊन येते. कुकरच्या पाच शिट्या झाल्या की कुकर बंद कर.’ आकाशने ‘हो’ म्हटले अन् आणि आई बाजाराला निघून गेली. इकडे आकाशने पुन्हा पुस्तक उघडले. आता राक्षस अन् परीची घमासान लढाई सुरू झाली होती. परी आपल्या जादूई छडीचा वापर करून राक्षसाला लोळवत होती. पण, राक्षसदेखील तितकाच ताकदवान होता. तोही परीला माघार घ्यायला भाग पाडत होता. त्यामुळे त्याचा शेवट काही होत नव्हता. वाचता वाचता आकाश बेडरूममध्ये गेला. तिथेच पलंगावर पडून तो गोष्ट वाचू लागला.

आता शेवटची तुंबळ लढाई सुरू झाली. परीने जादूच्या छडीने आग पेटवली. त्यात रानातला विशिष्ट पालापाचोळा टाकला अन् भला मोठा जाळ तिथं निर्माण केला. परीने टाकलेल्या पालापाचोळ्याचा एक वेगळाच जळकट वास साऱ्या रानात पसरला. राक्षसाला हा विचित्र वास सहन होईना. त्या वासाने राक्षसाला चक्कर येऊ लागली. आकाशला कळेना, गोष्टीत जाळलेल्या पालापाचोळ्याचा वास आपल्याला कसा येतो. आता मात्र राक्षसाची सहनशक्ती संपली. तो दाणदाण पाय आपटत होता. जोरजोरात ओरडत होता. त्याचे ते ओरडणे, दाणदाण पाय आपटणे आकाशला अगदी स्पष्ट ऐकू येत होते. शेवटी परीने आपली मंतरलेली जादूची छडी राक्षसाला मारली अन् राक्षस जोराजोरात ओरडून गतप्राण झाला. गोष्ट संपली तरी जळका वास जाईना. त्याचे ते दाणदाण पाय वाजवणे अन् जोरजोरात ओरडणे संपेना. त्या आवाजाने आकाश भानावर आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपलं सारं घर धुराने भरून गेलंय. त्याचाच जळकट वास येतोय. बाहेर कुणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होतं. त्याने धावत जाऊन दरवाजा उघडला. अन् समोर पाहिले तर त्याच्या घरासमोर केवढी गर्दी जमली होती. दरवाजा उघडताच भरभर धूर घराबाहेर पडू लागला. आई तोंडावर पदर धरून चटकन किचनकडे धावली. अंदाजाने, सावधपणे गॅसजवळ गेली. अन् गॅस बंद केला. आईच्या पाठोपाठ अनेक शेजारी घरात शिरले. त्यांनी सर्व खिडक्या झटपट उघडल्या.

घरातला धूर आता बऱ्यापैकी कमी झाला होता. आईने पाहिले गॅसवर ठेवलेला कुकर पार जळून गेला होता. त्या काळ्याकुट्ट पडलेल्या कुकरकडे बघत आई म्हणाली, ‘अरे बाळा, आकाश वाचलास रे वाचलास. नशीब कुकरचा स्फोट झाला नाही.’ आकाशला काही झालं नाही हे आईच्या लक्षात येताच आईने आकाशच्या पाठीत धपाटा घातला अन् म्हणाली, ‘गधड्या तुला सांगितलं होतं ना, पाच शिट्ट्या झाल्या की, कुकर बंद कर म्हणून, तुला काही झालं असतं मग!’ शेजारी-पाजारी लोक कुणी आकाशला तर कुणी आईला दोष देत आपापल्या घरी निघून गेले. आता कुठे आकाशच्या लक्षात आले की तो जळकट वास, तो धूर, ते दाणदाण पाय वाजवणे गोष्टीतले नसून आपल्याच घरात होते.

‘सॉरी हं आई, यापुढे मी नक्कीच काळजी घेईन.’ आकाश काकुळतीने म्हणाला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अन् पुस्तकांनी गच्च भरलेल्या पुस्तकांच्या कपाटाकडे बघत बघत आई स्वयंपाकघराकडे निघाली…!

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

55 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

2 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago