कोटेश्वरी देवस्थान हे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. देवीमाता ही तेज, ज्ञान व शौर्य तसेच अन्यायाला प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्र समुदायात ती मातृका म्हणून निवास करते.
- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासा जलदुर्ग) आहे, असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला. राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे. केवळ मुरुडकर नव्हे, तर रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून देवीचे भक्त वर्षातून एकदा तरी देवीचे दर्शन घेण्यास येतात.
मुरुड-जंजिरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड जिल्हा किनारपट्टी गावात एक किल्ला आहे. जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा एकमेव किल्ला आहे, जिचा कधीही विजय होऊ शकला नाही. स्थानिक लोक त्याला अजय्या किल्ला म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ अजेय आहे. असा विश्वास आहे की, हा किल्ला पंच पीर पंजतन शाह बंड्या बाबाच्या संरक्षणाखाली आहे. शाह बाबांची थडगीही या किल्ल्यात आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंच आहे. त्याचा पाया २० फूट खोल आहे. हा किल्ला सिद्दी जौहरने बांधला होता. हा किल्ला २२ वर्षांत बांधला गेला. हा किल्ला २२ एकरांवर पसरलेला आहे. त्यात २२ सुरक्षा चौक्या आहेत. हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटिश, पोर्तुगीज, शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिम्माजी आप्पा आणि संभाजी महाराजांनी बरेच प्रयत्न केले होते, पण कुणालाही यश आले नाही. सिद्दिकी राज्यकर्त्यांच्या अनेक तोफा अजूनही या किल्ल्यात ठेवल्या आहेत. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे, असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला! राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे.
देवीच्या नित्य पूजा-अर्चेचा मान गुरव घराण्याला आहे. गुरव घराणे सालकरी पद्धतीने पूजा-अर्चा पाहते, अशी माहिती सालकरी मनोहर गुरव व प्रमोद गुरव यांनी दिली. नवरात्रोत्सवात देवीला वस्त्र-आभूषणांचा साज चढवण्यात येतो. सालकरी गुरवांचा मुक्काम दहा दिवस मंदिरात असतो. नृत्ये व गीतगायन असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. होमहवन, नवचंडी होम, सप्तपदी, भजने असे नित्य धार्मिक कार्यक्रम सुरूच असतात. दसऱ्याला भल्या पहाटे देवीला ‘घोसाळ्याचा कळा’ वाहण्यासाठी भक्तांची रिघ असते. देवीसंबंधी दोन दंतकथा प्रचलित आहेत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत एक वाघ नवरात्रीच्या आदल्या दिवशी देवालय परिसरात आणि गुरव आळीत फेरफटका टाकण्यासाठी येत असे. वाघाला देवीचा दूत समजले जाई. व्यापारी प्रवीण शहा व अरविंद शहा यांच्या आजोबांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. तेव्हा दारी आलेल्या अज्ञात साधूने भोजनाची मागणी करून कोटेश्वरी देवीपाशी होम करण्यास सांगितले. तसे केल्यानंतर शहा कुटुंबात गणपतलाल व सुंदरलाल हे पुत्र झाले. तेव्हापासून शहा कुटुंबीयांची देवीवर अपार
श्रद्धा आहे.
कोटेश्वरी देवस्थानची जागा ही १९२५ च्या महसूल-जमीन सर्वेक्षणानुसार सरकारने दिलेली आहे. देवालयाची जागा दहा गुंठे आहे. मंदिर पूर्वी कौलारू होते. मंदिराचा जीर्णोद्धार पन्नास वर्षांपूर्वी कै. मधुकर लक्ष्मण दांडेकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत झाला. स्लॅबचे मंदिर उभारले गेले. कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट आहे. समिती सदस्य दरवर्षी यात्रेच्या आदल्या दिवशी पद्मदुर्गात देवीच्या मूळ स्थानापाशी पूजनासाठी जातात. देवीमाता तेज, ज्ञान व शौर्य तसेच अन्यायाला प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्र समुदायात ती मातृका म्हणून निवास करते.
चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. त्या आधी देवीची पालखी मुरुड शहरात काढण्यात येते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)