Thursday, July 10, 2025

नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक हैराण

नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक हैराण

मुरुड(प्रतिनिधी) : मुरुड नगर परिषदेच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या नाल्यांच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड पसरल्याने बाजारपेठ रस्त्यावर धुळवड होत आहे. या कामी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खडी व मातीमुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या कामी नगर परिषद अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.



मुरुड शहरातील विकासकामांचा धूमधडाका जोरात सुरू आहे, पण या कामात ठेकेदार बेजबाबदारपणे काम करीत असल्याने याचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारांची पाच फुटी खोली असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. गटारातील माती रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे. त्यातील खडी सर्वत्र पसरलेली आहे. या रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या वेगाने रस्त्यावरील माती घरात जात आहे. गाड्यांच्या टायर खालून रस्त्यावर पसरलेली खडी उडून घरात जात आहे. रस्त्यावर जात-येत असलेल्या नागरिकांच्या टायर खालून उडालेली खडी लागत आहे.



दुकानात धुळीचे लोट जात आहेत, त्यामुळे दुकानदारांच्या मालाचे नुकसान झाले आहे. तरी या बेजबाबदार ठेकेदाराला लगाम लावण्याची गरज आहे. या कामात ठेकेदाराने नागरिकांसाठी कोणत्याही स्वरूपाची सुरक्षाव्यवस्था केलेली नसल्याने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यावर पडलेली खडी व माती साफ करावी व या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments
Add Comment