Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे-बोरीवलीला जोडणाऱ्या जुळ्या बोगद्याचे काम ‘एल अँड टी’कडे

ठाणे-बोरीवलीला जोडणाऱ्या जुळ्या बोगद्याचे काम ‘एल अँड टी’कडे

> प्रकल्पाने ओलांडला १४ हजार कोटींचा आकडा

> काम पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी होणार कमी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे-बोरीवलीला जोडणाऱ्या जुळ्या बोगद्याचे कंत्राट मिळवण्यात ‘एल अँड टी’ ही प्रख्यात कंपनी यशस्वी झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च १४ हजार कोटीं रुपयांचा आकडा ओलांडला आहे.

ठाणे आणि बोरिवलीला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे काम करण्यासाठी लार्सन अँड टुब्रो, मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्या सर्वात कमी बोली लावणाऱ्या आहेत. या कंपन्यांच्या निविदा सर्वात कमी रकमेच्या ठरल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे हे काम त्यांनाच मिळाले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागणार असून सन २०२७ मध्ये या रस्त्यावरुन वाहनांची गर्दी दिसणार आहे. यासाठी चार ठिकाणी बोगदा खोदण्याचे काम सुरु करण्यात येणार असून,जोडमार्गाची लांबी वगळून प्रत्येक बोगद्याची लांबी ११.८४ किमी असणार आहे, असे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून समजते.

दुहेरी-बोगदा प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागला गेला आहे. जेव्हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) पायाभूत सुविधा कंपन्यांकडून दरपत्रक मागवले तेव्हा केवळ दोन कंपन्यांनी दोन्ही पॅकेज मिळविण्यात स्वारस्य दाखवले.

बुधवारी दोन्ही कंपन्यांच्या अर्जांची छाननी करून अधिका-यांनी कामांच्या निवाड्याला अंतिम स्वरूप दिले. उपलब्ध तपशीलानुसार, मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. (एमआयईएल) ही सर्वात कमी दरपत्रक असलेली फर्म आहे. त्यांना पॅकेज एकचे काम देण्यात आले असून दुसरे काम लार्सन अँड टुब्रोकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. एलअँड टी कंपनीने सर्वात कमी रक्कम ऑफर केली होती.

पहिल्या पॅकेजमध्ये बोरीवली ते ठाण्याकडे जाणारा ५.७५ किमीचा बोगदा खणण्यात येणार असून, दुस-या पॅकेजमध्ये ठाणे ते बोरीवलीकडे जाणारा ६.०९ किलोमीटरचा बोगदा खोदण्यात येणार आहे. जुळ्या-बोगद्याच्या बांधकामानंतर प्रवासाचा वेळ १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. प्राधिकरणाच्या योजनेनुसार, पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर येथे आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजीनी वाडीच्या पुढे होणार आहे.

सध्या रस्त्याने प्रवास करताना मागाठाणे ते टिकुजीनी वाडी हे २४ किमीचे अंतर कापण्यासाठी एका तासांहून जास्त वेळ लागतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या २३ मीटर अंतर्गत हा प्रकल्प बांधल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांपर्यंत कमी होईल,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्पासाठी ५७.०२ हेक्टर वनजमिनीची गरज

या प्रकल्पासाठी ५७.०२ हेक्टर वनजमीन वळवण्याची गरज आहे, जे ३९ हेक्टर वानखेडे स्टेडियम्सच्या बरोबरीचे क्षेत्र आहे. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १०६.५ वर्ग किमी किंवा १०,६५० हेक्टर आहे. याचा अर्थ राष्ट्रीय उद्यानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ०.५ टक्के क्षेत्र या प्रकल्पासाठी वळवायचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -