Thursday, September 18, 2025

वाड्यातील परळी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण

वाड्यातील परळी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण

वाडा (प्रतिनिधी) : वाडा तालुक्यातील परळी या अति दुर्गम गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असून, मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी परळी येथील नदीवर बंधारा बांधण्यात आला होता. मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे त्या बंधाऱ्याला गळती लागली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गावातील महिलांना घरगुती वापराच्या पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे, तर काही ग्रामस्थ वर्गणी काढून टँकरने पाणी विकत आणत आहेत.

परळी येथील समाजिक कार्यकर्ते तारक जाधव यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधेरे यांना गुरुवारी २७ एप्रिल रोजी एक निवेदन दिले आहे. नवीन पाइपलाइनदेखील गंजलेल्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी पाइप गळती आहे. सदर ग्रामपंचायत परळीची नळ पाणीपुरवठा योजना नादुरुस्त असल्याने येथील महिलांना रात्रं-दिवस पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये महिलांसोबत पुरूष मंडळी, वयोवृद्ध नागरिक तसेच आबालवृद्धांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. मात्र याचे कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना नाही. त्यातच कडक उन्हामुळे येथील विहिरी व इतर जलस्त्रोत पुर्णपणे आटले असून, ज्या काही थोड्या फार विहिरी अस्तित्वात आहेत, त्यामध्ये पाणी नावापुरते शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाण्याअभावी येथील ग्रामस्थांना तसेच पशू-पक्षी, प्राण्यांना तडफडून मरण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परळी येथील नागरिकांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवली नाही, तर मंगळवार, दि. ०२ मे २०२३ रोजी वाडा तहसील कार्यालयावर महिला व आबालवृद्धांसह प्रचंड हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment