
मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात मुंबईतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेचा उद्यान विभाग पावसाळापूर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करत असतो. यंदाही मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे सुरू आहेत. यंदा मुंबई शहरात एकूण ८५ हजार ५०५ झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या पैकी २४ हजार ७६ झाडांची छाटणी पूर्ण झाली असून ३१ मे अखेरपर्यंत उर्वरित ६१ हजार ४२९ झाडांची छाटणी होणार आहे.
वर्ष २०१७ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करून छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात, ज्यांच्यापासून कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही. यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख १५ हजार ११४ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्त्यांच्या कडेला असलेल्या सुमारे ८५ हजार ५०५ झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या पैकी, शुक्रवारपर्यंत २४ हजार ०७६ झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात आल्या आहेत. ३१ मे २०२३ अखेरपर्यंत उर्वरित ६१ हजार ४२९ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उदिष्ट पालिकेने ठेवले आहे.
झाडे पडून वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता
मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था, शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. हाऊसिंग सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्या छाटणीकामी, संतुलित करणे कामी पालिकेने ४ हजार ६२२ नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी पालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अतिशय वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.