Friday, November 15, 2024
Homeकोकणरायगडकोंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी मिटवून तयार केले कोंबडीखत

कोंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी मिटवून तयार केले कोंबडीखत

सेंद्रीय खत निर्माण करणाऱ्या हेमंत कोंडीलकर यांची आदर्श गाथा

कर्जत : आजच्या काळात शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यातून मार्ग काढून समस्येमध्येच समाधान असल्याचा आदर्श काही तरुण शेतकरी समाजासमोर ठेवत आहेत. खरे तर आज याचीच जास्त गरज आहे. कर्जत तालुक्यातील बार्डी येथील हेमंत कोंडिलकर हा तरुण याच पठडीतला! पोल्ट्री व्यवसाय आज प्रगत आणि प्रगल्भ होत आहे. मात्र त्यात असणाऱ्या अडचणी हेमंत या तरुणाला व्यथित करत होत्या. त्यामुळे त्यातील मुख्य अडचण असलेली कोंबड्यांची विष्ठा यावर त्याने संशोधन सुरू करत केवळ विष्ठेची दुर्गंधी मिटवली नाही, तर त्यापासून शेतीला उत्तम मात्रा ठरणारे सेंद्रीय असे कोंबडीखत देखील तयार केले. हेमंतच्या या कार्याची दखल शासनाच्या पशुसंवर्धन विभागापासून आज सर्वांनीच घेतली आहे, तर आदर्श शेतकरी म्हणून त्याचा गौरव देखील करण्यात आला आहे.

मनुष्य आज कैक आजारांनी त्रस्त आहे. आपल्याला माहीत नसलेले आजार रोज नव्याने डोके वर काढत आहेत. अनेकदा याबाबत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी व त्यातील जिन्नस हे मुख्य कारण मानले जाते. जगात एका बाजूला लोकसंख्या वाढत असून दुसऱ्या बाजूला या लोकसंख्येला पुरेसे अन्न निर्माण होत नाही ही मोठी समस्या आहे. त्यामुळे रासायनिक शेतीला महत्त्व दिले जाते; परंतु रसायनांचा मोठा वापर हा शेतीचा पोत बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारे अन्नदेखील कसदार राहत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे, तर शेतकऱ्यावर रोज नव्याने निसर्ग, बाजारातील पडणारे भाव हे घाला घालत असतात. त्यामुळे मागील काही वर्षात शेतकरी हा शेतीपासून दूर गेलेला दिसतो. आज ‘शेतकरी दिन’ उत्साहात साजरा केला जातो. सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जातात. मात्र दुसरीकडे शेतकरी ‘दीन’ झाला आहे हे सत्य स्वीकारायची तयारी कुणाची नाही हे मन हेलावून टाकणारे वास्तव आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा मिटवण्यासाठी शेतकरीपुत्र चांगले शिक्षण घेऊन पुढे येत आहेत, हे चित्र आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ आणि कर्जतच्या मध्यावर रेल्वेपट्ट्यात बार्डी हे छोटेसे गाव वसलेले आहे. या गावातील हेमंत नामदेव कोंडीलकर हा तरुण आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून एका बिल्डरकडे नोकरी करत होता. मात्र लहानपणापासून शेतीचा ओढा असल्याने त्याचे मन काही रमले नाही. त्यामुळे शेतीकडे तो वळला. भाजीपाला लागवड करताना विषमुक्त अन्न निर्माण करण्याची गरज आहे हे त्याने हेरले. मात्र स्वतः हे अंमलात आणताना सेंद्रीय खतांची मात्रा आवश्यक होती. पण त्यातही कमी खर्चात सेंद्रीय खते शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे शेतीला जोड म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. पोल्ट्री व्यवसाय वाढतही आहे. पण कोंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी मोठी असते. ती साफ करणे हे मोठे आव्हान मालकासमोर असते. ही बाब हेमंतच्या लक्षात आली. कोंबड्यांच्या विष्ठेत असणाऱ्या नत्राच्या अधिक प्रमाणामुळे शेतीचे नुकसान होते व ते कुजत नसल्याने जमिनीत हुमणीची समस्या होत होती. त्यावर उपाय शोधत त्याने पंचगव्यापासून बनवलेले कल्चर पोल्ट्रीतील तुसावर विशिष्ट प्रमाणित फवारणी केली. तेव्हा पोल्ट्रीतील दुर्गंधी कमी झाली. तसेच उत्तम प्रकारचे व कमी खर्चातले खत तयार झाले. हे कोंबडीखत शेती, भाजीपाला, फळझाडांवर वापरले असता खूप चांगले परिणाम समोर आले. भाज्यांमधील तजेलदारपणा, टवटवीतपणा, आणि चव उत्तमरीत्या असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात सेंद्रीय खत बनविता आले असल्याने हेमंतने समाधान व्यक्त केले.

अडचण संधी बनवली
आजच्या शेतीमध्ये विषमुक्त अन्न पिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रीय खत उपलब्ध व्हायला हवे आहे. मात्र सध्या पशुधन सर्व शेतकऱ्याकडे राहिलेले नाही. त्यामुळे सेंद्रीय खत तयार करणे सोपे राहिले नाही. तेव्हा शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रीय खत उपलब्ध करण्याचा मानस घेऊन पोल्ट्रीतील अडचण ही संधी बनवली. हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. आजचे दिसणारे यश हे कधी काळी डोकेदुखी ठरली होती. पण डोळ्यांसमोर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा असल्याने हा प्रकल्प अस्तित्वात आला आहे.
– हेमंत कोंडिलकर, (कोंबडीखत निर्माता शेतकरी)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -