Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सलाइक करा, पण पैसे गमावू नका...

लाइक करा, पण पैसे गमावू नका…

  • गोलमाल : महेश पांचाळ

सोशल मीडियाचा जमाना आहे. कोणतेही माहिती आता गुगलवर आपल्या मोबाइलवर सहज प्राप्त करता येते; परंतु व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्टाग्राफ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या विविध मित्र मैत्रिणीच्या ग्रुपच्या माध्यमातून माहितीच्या पोस्ट पडत असतात. तशा नोकरीच्या जाहिरातीही आपल्या दृष्टिक्षेपात पडत असतात. सर्वसाधारणपणे माहितगार व्यक्तीच्या संपर्कातून एका जॉबसंदर्भात जाहिरात आली, तर आपण ती कटाक्षपणे पाहतो; परंतु कधी कधी गरज ही शोधाची जननी बनते. त्याप्रमाणे आपल्याला पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करावासा वाटतो तेव्हा, व्हॅकेन्सी, जॉब असे शब्द आपल्याला खुणावत असतात. कधी कधी आपण ज्यांच्याशी आपण कधी बोललेलो नसतो त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो; परंतु कमी ज्ञानाचे जॉब असल्याचे कळते तेव्हा आपण त्याकडे आकर्षित होतो, हा मानवी स्वभावाचा भाव असू शकतो. पोस्टला लाइक करण्याचे साध्यासुध्या कामातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते, असे वाटल्यानंतर आपल्या खात्यातून पैसे जमा होण्याऐवजी चार लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे गमावण्याची वेळ एका महिलेवर आली.

नक्की कशी फसगत झाली ते पाहा. व्हॉट्सअॅपवर Gobal Advert Corp Official या कंपनीच्या नावे पार्टटाइम जॉबसाठी संदेश पाठवण्यात आला होता. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झाला होता. ज्यांना पार्टटाइम जॉब हवा आहे, त्यांना कंपनीच्या टेलीग्राम ग्रुप जॉइन होण्यास सांगितले गेले. या टेलिग्राम ग्रुपवर कंपनीचा प्रोफाइल असलेली यूट्यूब लिंक देण्यात आली होती. ती लिंक ओपन करून त्या व्हीडिओ लाइक करण्याचा जॉब टास्क देण्यात आला. म्हणजेच काय तर लाइक करण्याचे तुम्हाला पैसे मिळणार होते. घरबसल्या पैसे येणार असतील, तर कोणाला नको आहेत. त्यानुसार सोनाली (नाव बदलेले) या महिलेला कुटुंबाला हातभार लागला या हेतूने लाइक करण्याचा पार्टटाइम जॉब करण्याचे मनी ठरविले. तसेच सोनालीने जॉब टास्क स्वीकारला. सुरुवातीला लाइक केल्याच्या कामाचा मोबदला म्हणून सोनालीच्या बँक खात्यात पहिल्यांदा १५० रुपये जमा झाले. त्यानंतर १३०० रुपये जमा झाले. त्यानंतर ७५०० रुपये बँकेच्या खात्यावर जमा होत होते. टास्क पूर्ण केल्यावर पैसे सोनालीच्या बँक खात्यावर जमा होत गेल्याने तिचा कंपनीवर विश्वास वाढत गेला होता. त्यानंतर कंपनीने सोनालीला मोठा टास्क असल्याचे सांगितले. हा टास्क पूर्ण केल्यास खात्यावर लाखो रुपये जमा होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार १२ हजार रुपये, २५ हजार रुपये आणि ५० हजार रुपयांची रक्कम सोनालीला ६ मार्च ते १८ मार्च २०२३ या १२ दिवसांच्या कालावधीत कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले होते. घरबसल्या लाखो रुपये घरात येतील, या आशेने सोनालीने चार लाख ३२ हजार रुपये कंपनीच्या बँक खात्यावर जमा केले होते. मात्र आपल्या खात्यावर पैसे का जमा होत नाही? हे कळल्यावर सोनाली टेन्शनमध्ये आली. मोठ्या रकमा भरावयास लावून जास्त पैसे कमवण्याचे आमिष देण्यात आले खरे. पण या आमिषाला बळी पडून आपली फसवणूक झाल्याची जाणीव सोनालीला झाली. त्यानंतर तिने स्थानिक चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करून अजमेर, राजस्थान येथून चार आरोपींना ताब्यात घेतले. विविध बँकांचे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेले एकूण ४३ एटीएम कार्ड्स, २५ चेक बुक, विविध मोबाइल कंपन्यांचे ३२ सुटे सिम कार्ड व विविध कंपन्यांचे एकूण २२ मोबाइल फोन यावेळी अटक आरोपींकडून चुनाभट्टी पोलिसांनी जप्त केले. तसेच तपासादरम्यान माहिती मिळालेल्या माहितीनुसार विविध २४ बँक खात्यातील एकूण ९७ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. नमूद गुन्ह्याचा तपास चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल देसाई, पोनि समाधान पवार, तपासी अधिकारी पोनि राजू दुबल, सपोनि सचिन सरडे, सपोनि प्रदीप पाटील, सपोनि भरत जाधव, सपोनि किशोरकुमार झोटिंग, पोउनि हेमंत मिरजे पोह विजय घाडगे, पोह दशरथ राणे (परिमंडळ ६ कार्यालय) पोना सागर बाघ, पोशि सुचेंद्र शेटे, मपोशि छावा टेंगले यांनी केला आहे. ऑनलाइन नोकरी, YouTube Link लाइक करून पैसे कमविणे, विविध वेबसाइटवर ऑनलाइन वस्तू विकून कमिशन मिळविणे अशा प्रकारचे आमिष सायबर भामट्यांकडून दाखविण्यात येते. अशा आमिषाला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे. तसेच सोशल मीडियावर अॅक्टिव् असता आपली गोपनीय सेटिंगचा वापर करणे, कोणत्याही अनोळखी इसमावर विश्वास न ठेवणे, ऑनलाइन बँक व्यवहार करताना काळजी घेणे, आपला पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही न देणे अशा प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तात्पर्य : पार्टटाइम किंवा फुल टाइम काम करण्याच्या अनेक जाहिरात आपल्या नजरेखालून जात असल्या तरी, कामाचा मोबदला म्हणून खात्यावर पैसे जमा होणे हा एक भाग आहे. तरीही आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगायला हवी.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -