Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सआंब्यांच्या गावाला जाऊया!

आंब्यांच्या गावाला जाऊया!

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

‘आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो’
फळांचा राजा आंबा आणि त्यात हापूस म्हणजे तर जणू महाराजा!
आम्रसम्राटाची स्वारी जनतेच्या दरबारात कधी येते, याची प्रत्येकाला उत्कंठा लागलेली असते आणि तोही वाट पाहायला लावत, आपला भाव वाढवत अंमळ उशिरानेच बाजारात अवतरतो.

आंबा खरेदीपासून ते त्याच्या अमृतमयी रसास्वादाने आपली रसना तृप्त होईपर्यंतचा प्रवास हा प्रत्येक आम्रप्रेमीसाठी एक अत्यंत खास व जिव्हाळ्याचा विषय असतो. वसंत ॠतूच्या आगमनासवे आंबे मोहोराचा सुगंध अवघ्या आसमंतात दरवळू लागतो. बघता बघता झाड बाळ कैऱ्यांनी लगडून सजतं. वाऱ्याच्या झोतासवे त्या कैऱ्या मजेत झुलताना पाहण्याचा आनंद प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कसा कळावा? त्यासाठी गावीच जायला हवं.

मला माझं कोकणातलं छोटंसं गाव आठवतं. खरं तर त्या गावच्या आठवणींना आंब्याच्याच रंग-गंधाचं सुरेख रेशमी अस्तर लाभलेलं आहे. कारण आम्ही गावी जायचो तेच मुळी उन्हाळ्याच्या सुट्टीत-म्हणजेच ऐन आंब्याच्या दिवसात.
आमची आंब्याची झाडं होती. आम्ही जायचो तेव्हा झाडं हिरव्याकंच कैऱ्यांनी डवरलेली असत. मध्येच एखादा फिकट शेंदरी आंबा लक्ष वेधून घेई.

झाडावरून एखादी कैरी खाली पडली किंवा माळीबाबांची नजर चुकवून दगड भिरकावून खाली पाडल्यानंतर ती मिळवण्यासाठी आम्हा बहीण-भावंडात चढाओढ लागे. अर्थात कैरी कोणालाही मिळाली तरी नंतर सुरीने कापून तिचे बारीक तुकडे करून त्यावर तिखट-मीठ पेरून सर्वजण मिळून ती खात.

मला आठवतंय गावी आमचं एक भलं थोरलं आंब्याचं झाड होतं. एवढा डेरेदार वृक्ष फार क्वचितच पाहायला मिळतो. पण, आमचं भाग्य की तो आमच्या आजोबांकडे होता. खरंतर तो वृक्षही आम्हाला आजोबांसारखाच वाटायचा. भारदस्त तरीही प्रेमाने मायेची सावली धरणारा, स्वतः उन्हातान्हात उभं राहून आम्हाला गोड फळं देणारा! त्या झाडाला भरपूर आंबे लागत. दुर्दैवाने एका वर्षी तो वृक्ष वठून मरून गेला. मला हे समजलं तेव्हा फार वाईट वाटलं. आपल्या घरातलंच कोणी माणूस गेल्याचं मला दु:ख झालं.

आंब्याची आढी लावणे हा एक मोठा कार्यक्रम त्या दिवसांत गावी असायचा. आजोबा, काका, बाबा सर्व मोठी मंडळी कैऱ्या ठरावीक आकारात मोठ्या झाल्यानंतर त्या झाडावरून उतरवून घेत. घराच्या बाजूला एक रिकामी खोली वजा गोडाऊन होतं. तिथे पेंढा पसरवून त्यावर आंब्याची आढी लावली जात असे. आंबे जसजसे पिकू लागत, तसतसा त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत राही.

साधारण पिकलेले आंबे पेट्यांमध्ये भरून झाल्यावर उरलेल्या आंब्यांवर आमचाच हक्क असायचा. आम्ही बाळ गोपाळ मंडळी त्याचा पुरेपूर व मनसोक्त आनंद घ्यायचो. आमच्यासाठी बाबा चोखायचे छोटे हापूस आंबेही आणत. कुणी किती आंबे खायचे यावर काहीही बंधन नसायचं. आंबे खाण्याची आमच्यात चढाओढ लागत असे. बसल्या बैठकीला प्रत्येकी १०-१२ आंबे सहज फस्त होऊन जात. मात्र तरीही आंबे खायचा ना कधी कंटाळा येई, ना ते खाल्लेले आंबे आम्हाला बाधत. कित्येकदा दुपारच्या वेळी जेव्हा सारे वामकुक्षी करत त्यावेळी हळूच आंब्यांच्या खोलीत शिरून आम्ही तिथले पिकलेले आंबे लंपास करत असू. त्या चोरून खाल्लेल्या आंब्यांचा स्वाद अधिकच मधुर भासे.

आंब्याचेही वेगवेगळे प्रकार असतात, हे तेव्हा आम्हाला फारसं उमगलं नाही. पण, हापूस प्रमाणेच पायरी, रायवळ, लंगडा, तोतापुरी, केशर असेही आंब्याचे विविध प्रकार असतात हे नंतर कळलं. मात्र तरी शेवटी हापूस तो हापूस या निष्कर्षाप्रत आपण येतोच. हापूसची सर कशालाच नाही हो! पटतंय ना तुम्हालाही?

आता गावाकडे जाणं होत नाही. तिथली परिस्थितीही खूप बदललेली आहे. आंब्याबद्दलच्या जिव्हाळ्याची जागा आता आंब्याच्या व्यापारीकरणाने घेतल्याचे वास्तव जाणवून मन किंचित अस्वस्थही होतं. कालाय तस्मै नमः दुसरं काय!
मात्र तरीसुद्धा आजही एप्रिल, मे महिना आला की, गावच्या आंब्याच्या वाटेकडे डोळे लागतात आणि आंब्याच्या धुंद सुवासाने मनाचा गाभारा ओतप्रोत भरून जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -