Sunday, October 26, 2025
Happy Diwali

विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवेचा प्रारंभ

विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवेचा प्रारंभ

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे निदान करणे शक्य होणार आहे.

विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने एन्डोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या एन्डोस्कोपी सेवेचे लोकार्पण शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रख्यात एन्डोस्कोपिस्ट डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर आणि शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. स्मृती घेटला यांची उपस्थिती होती. डॉ. मोहन जोशी यांनी 'एन्डोस्कोपी कशी करावी' या विषयावर वैद्यकीय विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.

एन्डोस्कोपी ही पोटविकारांचे निदान करण्यासाठी केली जाणारी अत्याधुनिक प्रक्रिया आहे. या अंतर्गत अत्यंत सूक्ष्मपणे पाहू शकणारी दुर्बीण ही एन्डोस्कोपच्या मदतीने शरीराच्या नैसर्गिक छिद्रांतून शरीराच्या आत सोडली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. या नलिकेच्या पुढील बाजूस उच्च क्षमतेचा कॅमेरा असतो. त्या माध्यमातून पोटातील विविध अवयवांच्या प्रतिमा डॉक्टर संगणक किंवा अन्य पटल (स्क्रिन) वर पाहू शकतात. याद्वारे वैद्यकीय तज्ज्ञांना विविध आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते.

Comments
Add Comment