
महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे, हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ. रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन तसेच भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ॲलन गानू यांनी येथे निमंत्रित करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी २८ टक्के महाराष्ट्रात येते. सर्वाधिक वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानी सुद्धा आहे आणि ७०० किमीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मॉरिशसमध्येही ‘जय शिवराय...’
मॉरिशसमध्येही आता ‘जय शिवराय’चा जयघोष होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी शुक्रवारी सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले. या दौऱ्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणामुळे मॉरिशसमध्ये असलेल्या मराठी बांधवांच्या आनंदात भर पडली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मॉरिशसमध्ये मराठी बांधवांची संख्या जवळपास ७५ हजार आहे. महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, रत्नागिरी, पुणे या भागातील लोक मॉरिशसमध्ये स्थित आहेत. हे सर्व मॉरिशसमध्ये मराठी परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पुतळा आहे. दरम्यान शनिवारी फडणवीस यांची मराठी समुदायांशी भेट, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर फडणवीस मायदेशी परततील.